गोंदिया : धारदार शस्त्राने गळा चिरून एका २० वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवार ९ ऑक्टोबर रोजी गोंदिया तालुक्यातील बोंडराणी (अर्जुनी) गाव शिवारात उघडकीस आली. आचल प्रकाश कोबळे (रा. बोंडराणी) असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
गोंदिया तालुक्यातील बोंडराणी हे गाव वैनगंगा नदी काठावर आहे. कोबळे कुटुंबीय मासेमारी व शेतमजुरी करतात. आचल कोबळे चे गावातीलच दुसऱ्या समाजातील एका तरुणा सोबत सूत जुळले होते. त्यांच्या विवाहाला दोन्ही कुटुंबीयां कडून विरोध असल्याने ते अखेर पळून गेले होते. पण काही दिवसांपूर्वीच ते बोंडराणी गावात परत आले. दोन्ही कुटुंबात गावातील काही मंडळीच्या मध्यस्थीत चर्चा झाल्यानंतर आचल कोबळे बोंडराणी येथे वडिलांच्या घरी परतली. आचलच्या कुटुंबीयानी तिच्या लग्नासाठी स्थळ बघितले होते. गुरुवारी तिला पाहण्यासाठी पाहुणे येणार होते.
दरम्यान, गुरुवारी दुपारच्या सुमारास शेजारील महिलेला आचलच्या घरापासून काही अंतरावर ती बेशुद्धावस्थेत आढळली. तिच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे घाव आढळले. याची माहिती गावामहिलेने कोबळे कुटुंबीयांना दिली. यानंतर कुटुंबीयांनी लगेच आचलला तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. येथील डॉक्टरांनी आचल ला तपासून तिला मृत घोषित केले. या नंतर आचलच्या भावाने पोलिसांत तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. याप्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीचा शोध सुरू….
आचलच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे घाव आढळले. त्यामुळे तिची हत्या झाल्याचा संशय असून दवनीवाडा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. तसेच आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली ज्या तरुणासोबत ती यापूर्वी गेलेली होती तो तरुण या घटनेनंतर बोंडराणी गावातून पसार झाला असल्यामुळे या प्रकरणातील संशयाची सुई त्याकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस दुसऱ्या दृष्टीकोन ने पण तपास करीत आहे. असे तिरोडाचे पोलिस निरीक्षक अमित वानखेडे यांनी सांगितले.
प्रौढाचा तलावात बुडून मृत्यू
तलावातून डोंग्याच्या मदतीने शिंगाडे काढण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा डोंगा उलटून मृत्यू झाल्याची घटना आमगाव येथील पॉवरहाउस जवळील तलावात गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. सुखदेव कवरलाल दुधबर्वे (५५) रा. माल्ही, ता. आमगाव असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार सुखदेव दुधबर्वे यांचा शिंगाडे विकण्याचा व्यवसाय आहे. ते नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी आमगाव पॉवरहाउस येथील तलावात शिंगाडे काढण्यासाठी गेले. डोंग्यात बसून तलावातून शिंगाडे काढत असताना डोंग्याचे संतुलन बिघडल्याने तो उलटल्याने सुखदेव दुधबर्वे हे तलावात बुडाले. हा प्रकार तलावाजवळ उभ्या असलेल्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तलावात बुडालेल्या सुखदेव दुधबर्वे यांना बाहेर काढून त्वरित आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी त्यांचा मुलगा नितेश सुखदेव दुधबर्ते यांच्या फिर्यादीवरून आमगाव पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.