गोंदिया: गोंदिया शहरातील क्रीडा संकूलासाठी अधिग्रहण करण्यात आलेल्या शेतजमीनीचा पूर्ण मोबदला शेतकर्याला देण्यात आला नसल्याने हा मोबदला गोंदिया नगर परिषदेला चांगलाच भोवला असून सोमवार २९ सप्टेंबर २०२५ रोजी गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाने नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या खुर्चीसह नगर परिषद कार्यालयातील इतर साहित्य जप्त करण्यात आले.
शहरातील छोटा गोंदिया परिसरातील शेतकरी संतोष ढेकलप्रसाद पटले यांची शहरातील मरारटोली परिसरात साझा क्रमांक ३० मधील ३ एकर शेतजमीन क्रीडा संकूलासाठी अधिग्रहित करण्यात आली. त्यासाठी २००२ या वर्षीपासून कार्यवाहीला सुरुवात केल्यानंतर २०११-१२ या वर्षी पटले यांच्याकडून २४ लाख ८२ हजार शासकीय बाजार मुल्यानुसार जागा अधिग्रहण करण्यात आली. त्यावेळी सदर जागेची बाजार भावाप्रमाणे ४ कोटी रुपये किमत असल्याने पटले यांनी वाढीव मोबदला देण्याची मागणी केली. मात्र, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी न्यायालयाने २०१७ या वर्षी आपला निकाल देत ३६ लाख ३४ हजार रुपये वाढीव मोबदला पटले यांना देण्याचे आदेश नगर परिषदेला दिले. मात्र, नगर परिषदेकडून तसी कुठलही कार्यवाही करण्यात आली नाही. यावर न्यायालयाच्या आदेशानुसार १६ फेब्रुवारी २०२३ रोजी नगर परिषदेत जप्ती कारवाई करून मुख्याधिकारी यांच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त करण्यात आले होते.
असे असताना नगर परिषदेकडून संबंधित शेतकर्याला त्यानंतर दमडीही देण्यात आली नाही. यावर पटले यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतल्याने गेल्या काही दिवसांपूर्वी नगर परिषदेकडून पटले यांना ३ लाख रुपये देण्यात आले. असे असताना उर्वरीत ३३ लाख ३४ देण्यात आले नाही. सोमवारी न्यायालयाने पुन्हा नगर परिषद कार्यालयातील साहित्य जप्ती करण्याचे आदेश दिले. यानुसार शेतकरी पटले यांच्यासह बेलीफ आर. डी. सुखदेवे, सहाय्यक धर्मेश ढोबळे यांनी मुख्याधिकारी यांची खुर्ची, तीन स्टील खुर्ची, आस्थापना विभागातील खुर्ची व इतर साहित्य जप्त केले. विशेष म्हणजे, जप्तीची कारवाई सुरू होताच मुख्याधिकारी संदीप बोरकर कक्ष सोडून बाहेर गेले. आस्थापना विभागातील संगणक जप्तीची ही करण्यात आली.
आम्ही न्यायालयाच्या आदेशानुसार साहित्य जप्त करीत आहोत. यापूर्वीही १६ फेब्रुवारी २०२३ रोजी जप्तीची कारवाई करून मुख्याधिकारी यांची खुर्ची जप्त केली होती. आज सोमवारी पुन्हा जप्तीची कारवाई करण्यासाठी आलो असता मुख्याधिकार्यांनी सहकार्य न करता कार्यालयाबाहेर निघून गेले. – संतोष पटले, शेतकरी, छोटा गोंदिया