गोंदिया : पावसाची सरसर… काळ्या मातीचा सुगंध… आणि त्यात गुडघाभर चिखलात भरलेली शाळा ही केवळ कल्पना नाही, तर तिरोडा तालुक्यातील भजेपार जिल्हा परिषद शाळेने शनिवार १२ जुलै रोजी प्रत्यक्षात साकारलेला एक प्रेरणादायी प्रयोग !
‘बांधीवरची शाळा’ या अभिनव उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात, शेतातच शिक्षण देण्यात आले. शेतकऱ्यांचे जीवन, भातलावणीसारखी शेतीची प्रात्यक्षिके, आणि पावसाच्या कवितांमधून विद्यार्थ्यांनी केवळ आनंद घेतला नाही, तर श्रमाचे आणि अन्ननिर्मात्यांचे महत्त्वही जाणले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, सहकार्य आणि निसर्गाविषयी आदर जागविण्यात यश मिळाले, असे मत शिक्षिका भाग्यश्री रेवडेकर यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी स्वतः परा काढून भात रोवला, पावसात भिजत कविता म्हटल्या आणि शेतकरी गीतांवर ठुमकत चिखलात नृत्यही केले.
शेतकऱ्यांनी नांगरणी, भातलावणी आणि रोवणी यांची माहिती दिली. याशिवाय आधुनिक कृषी यंत्रसामग्री आणि गावातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा विद्यार्थ्यांपुढे सादर करण्यात आल्या. ‘बांधीवरची शाळा’ ही संकल्पना म्हणजे कृतीशील शिक्षणाची सुंदर मूर्तरूप आहे. भजेपार शाळेच्या उपक्रमाने ग्रामीण शिक्षणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकले असून, अशा उपक्रमांचे अनुकरण इतर शाळांनीही करावे अशी प्रेरणा मिळते.
“चार भिंतीबाहेरचं शिक्षण आणि नवनवीन अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना जीवनाचे वास्तव चांगल्या प्रकारे उमगते. ‘एक दिवस बळीराजासाठी’ या भावनेने शेतात उतरलेल्या मुलांनी आज केवळ शिक्षणच नाही तर जीवनाचेही धडे घेतले.“ – रामेश्वर बावनकर, मुख्याध्यापक.
सिद्धार्थ विद्यालय डवकी येथील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन घेतले भातपीक शेती शिक्षणाचे धडे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. या भारत देशातील सुजान पिढी घडवण्याचे काम शाळांमधून केले जाते. बालपणापासूनच विद्यार्थांचे बहुआयामी व्यक्तिमत्व घडविण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांना लहान वयातच शेतीची आवड निर्माण व्हावी, यांत्रिक शेती आणि पारंपारिक शेती यातला फरक समजावा. याकरिता देवरी तालुक्यातील मौजा डवकी येथील सिद्धार्थ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेतील परिसरातील शिवराम मरस्कोल्हे यांच्या शेतामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शेती शिक्षणाचे धडे देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष भात रोप काढणे, शेतीची मशागत, जोत (ओत) धरणे, बांघ घालणे, भात लावणी, या कामांचा कृतीयुक्त सहभाग विद्यार्थ्यांनी घेतला. तसेच पारंपारिक शेतीची अवजारे व यांत्रिक अवजारे यांची माहिती प्राचार्य महेंद्र मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच याप्रसंगी शेतकऱ्यांची मुलाखत विद्यार्थ्यांनी घेऊन शेताबद्दल पारंपारिक शेती आणि यांत्रिक शेती याबद्दल माहिती घेतली.
प्रगतिशील शेतकरी शिवराम मरस्कोल्हे यांनी यांत्रिक साधनांचा वापर करून शेती करणारे शेतकरी यांची मुलाखत घेण्यात आली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शार्दुल मेश्राम यांनी विशेष सहकार्य केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, शाळेतील शिक्षक वृंद यांनी विशेष सहकार्य केले.