गोंदिया : ‘इंडिगो एअरलाईन्स’सारख्या प्रतिष्ठित कंपनीची गोंदिया ते हैदराबाद दैनंदिन विमानसेवा सुरू असतानाच आता ‘स्टार एअर कंपनी’ने आज मंगळवार, १६ सप्टेंबरपासून गोंदिया ते इंदूर-बंगळुरू विमानसेवा सुरू केली आहे. ही विमानसेवा आठवड्यातून मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवसांसाठी असेल. येथील बिरसी विमानतळावरून उड्डाण घेतलेले विमान इंदूरला पोहोचेल आणि अर्ध्या तासानंतर हेच विमान इंदूरहून बंगळुरूलाही रवाना होईल.

हे विमान इंदूरहून संध्याकाळी ५ वाजता उड्डाण करेल आणि गोंदियातील बिरसी विमानतळावर ५.५५ वाजता उतरेल, तर गोंदियाहून ६.२५ वाजता उड्डाण करेल आणि ७.२० वाजता इंदूरला पोहोचेल. अर्ध्या तासानंतर हेच विमान बंगळुरूला उड्डाण करेल. अशा प्रकारे, गोंदियाचा प्रवास अवघ्या ५५ ​​मिनिटांत पूर्ण होईल. गोंदिया-इंदूर उड्डाणाकरिता आज पहिल्याच दिवशी एकूण ४४ प्रवाशांनी नोंदणी केली होती.

इतर सेवादेखील लवकरच

सध्या ‘स्टार एअरलाईन्स’ने गोंदिया ते इंदूर अशी तीन दिवसांसाठी विमानसेवा सुरू केली आहे, जी लवकरच नियमित दैनंदिन सेवेत रूपांतरित होईल. गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्यांतील नागरिक, व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या विशेष मागणीनुसार खासदार प्रफुल्ल पटेल गोंदिया ते मुंबई, पुणे आणि दिल्ली, अशी विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यांचे हे प्रयत्नांना लवकरच यश येईल, असा विश्वास माजी आमदार राजेंद्र जैन यांनी उद्घाटन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केला.

उद्घाटन सोहळ्याला बिरसी विमानतळ संचालक गिरीशचंद्र वर्मा, ‘स्टार एअर’चे पंकज कांबळे, प्रमोद सोनी, किरण सावळे, दीपक कुमार, सुनील साबळे, आदी उपस्थित होते. याप्रसंगी गोंदिया-इंदूर विमान प्रवासासाठी नोंदणी करणाऱ्या आदर्श दुबे, पूर्ती दुबे आणि आरंभ दुबे यांना प्रतिकात्मक तिकीट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

२० सप्टेंबरपासून गोंदिया ते हैदराबाद विमानसेवा दररोज

गोंदियामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे बिरसी विमानतळ आणि वैमानिक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. एअर इंडिया विमान अपघातानंतर बिरसी विमानतळावरील गोंदिया ते हैदराबाद विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस करण्यात आली होती. आता २० सप्टेंबरपासून इंडिगोची विमाने बिरसी विमानतळावरून हैदराबादला नियमितपणे उड्डाण घेतील. विमानांमध्ये सतत येणाऱ्या समस्यांमुळे, खबरदारीचा उपाय म्हणून इंडिगोने त्यांच्या सेवेत बदल केले आणि २ जुलैपासून पुढील आदेश येईपर्यंत, दररोज चालवल्या जाणाऱ्या इंडिगोच्या उड्डाणे आठवड्यातून फक्त तीन दिवस चालवल्या जात होत्या, परंतु तांत्रिक समाधानानंतर, इंडिगोने शनिवार २० सप्टेंबर पासून पूर्वीच्या वेळापत्रकानुसार गोंदिया हैदराबाद विमान सेवा पुन्हा सुरू करणार आहेत.

विमानतळ संचालक गिरीशचंद वर्मा यांनी २९ सप्टेंबरपासून हैदराबादला जाणारी उड्डाणे नियमित होणार असल्याची माहिती ‘लोकसत्ता’सोबत बोलताना दिली.