लोकसत्ता टीम
बुलढाणा : राज्य पातळीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे प्रमुख राज ठाकरे एकत्र येण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. यावर सत्ताधारी व विरोधी पक्ष, नेते व पदाधिकारी मधून वेगवेगळी प्रतिक्रिया येत आहे. यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भविष्यात हे दोन बंधू आणि पक्ष एकत्र येतात का याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज बुलढाणा शहरात जहाल आंदोलन करण्यात आले. एकत्र येण्याची चर्चा होत असताना मात्र मनसेने हे आंदोलन तूर्तास तरी स्वबळावर केले. हिंदी सक्ती विरोधात बुलढाण्यात मनसे आक्रमक झाली असल्याचे यावेळी दिसून आले. यावेळी मनसे च्या वतीने जिल्हा परिषदेसमोर हिंदी भाषा सक्ती संदर्भात निर्गमित शासकीय निर्णयाची होळी केली.
बुलढाण्यात मनसेकडून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आज बुलढाणा जिल्हा परिषदेसमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी भाषा सक्तीच्या जीआरची होळी करण्यात आली. दरम्यान, हिंदी भाषा सक्तीच्या जीआरची प्रत फाडत व दहन करीत मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी देण्यात आलेल्या, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, राज ठाकरेंचा विजय असो, हिंदीची सक्ती चालणार नाही चालणार नाही,’ या घोषणानी परिसर दुमदुमला.
राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने पहिल्या वर्गापासून हिंदी भाषेची सक्ती केलेली आहे. ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती योग्य नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना याला प्रचंड प्रमाणात विरोध करणार आहे. यापुढे जर हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्र शासनाने जर तो निर्णय मागे घेतला नाही तर यापुढचा जो धूर आहे तो शिक्षणाधिकाऱ्यांच्या केबिन मधून निघेल याची गंभीर दखल शासनाने घेतली पाहिजे. निर्णय ताबडतोब घेतला पाहिजे, अशी प्रतिक्रिया मनसेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी प्रसिद्धी माध्यमासोबत बोलताना दिली.