नागपूर : वृद्ध वडिलांना कुटुंबियांनी घरातून बाहेर काढले. मात्र, चार वर्षांची आवडती नात घरी आल्याचे कळताच आजोबाचा नातीवरील प्रेमांचा बांध फुटला. त्यांनी तिला भेटण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, कुटुंबियांचा विरोध आडवा आला. अखेर अंगणात खेळत असलेल्या नातीला घेऊन आजोबा पसार झाले. दुसऱ्या दिवशी मात्र चिमुकलीला परत घरी सोडून आजोबा पुन्हा घराबाहेर निघून गेले. मात्र मुलगी घरी नसल्याने कुटुंबियांची चांगलीच तारांबळ उडाली. नात आणि आजोबाच्या प्रेमाचा दाखला देणारी ही घटना अजनी परीसरात घडली.

६२ वर्षीय वृद्धाला त्यांच्या कुटुंबियांनी घराबाहेर काढले होते. त्याचे मुलीच्या चारवर्षीय मुलीवर (नात) प्रेम होते. त्यांची चागंली गट्टी जमली होती. शनिवारी मुलगी प्रसुतीसाठी माहेरी आली. तिच्यासोबत तिची चार वर्षाची चिमुकली सुद्धा होती. ती चिमुकली आल्याचे आजोबाला कळले. त्यांनी नातीला भेटण्यासाठी कुटुंबियांंना विनंती केली. मात्र, त्यांना घरात घेण्यास कुटुंबिय तयार नव्हते. नातीवर असलेल्या जीवापाड प्रेम आजोबांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांनी कुटुंबियांच्या चोरून नातीला भेटण्याचे ठरविले. रविवारी अजनी परिसरातील घराजवळ नात खेळत होती. आजोबा तिच्याजवळ गेले. आजोबाला बघताच नातीनेही त्यांना घट्ट मिठी मारली. लगेच कडेवर जाऊन बसली. आजोबांनी तिला शेजारच्या दुकानातून चॉकलेट आणि चिप्स घेऊन दिले. वस्तीतील उद्यानात गेले. आजोबा-नातीची रात्री आठ वाजेपर्यंत ते तेथे खेळत होते. नंतर नातीला पुन्हा भूक लागल्याने दोघेही एका मित्राच्या घरी गेले.

हेही वाचा >>>फडणवीसांच्या जिल्ह्यातच जलयुक्त शिवारची कामे अर्धवट, शेतकऱ्यांना फटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिमुकलीने जेवन केले आणि ती झोपी गेली. आजोबासुद्धा तिला मांडीवर घेऊन तेथेच झोपले. दुसरीकडे चिमुकली अंगनात दिसत नसल्यामुळे कुटुंबियांची धावपळ उडाली. शोधाशोध केल्यानंतर पोलिसात धाव घेतली. चिमुकलीचे अपहरण झाल्याचे ऐकताच अजनी पोलिसांच्या मनात धस्स झाले. पोलिसांनी वायरलेसवर संदेश देऊन शोधाशोध सुरु केली. कुटुंबियसुद्धा काळजीत पडले. दुसरा दिवस उजाडला. सकाळच्या सुमारास आजोबा नातीला घेऊन घरासमोर उभे दिसले. कुटुंबियांनी पुन्हा आजोबांची कानउघडणी केली. मात्र, ते निघून गेले. अशाप्रकारे आजोबा आणि नातीच्या प्रेमाचे नाते उलगडणारी घटना उघडकीस आली.