देवेश गोंडाणे, लोकसत्ता

नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षा नियोजनाचा नवा गोंधळ समोर आला आहे. अमरावती येथील परीक्षा केंद्रावर २४ ऑक्टोबरला गट ‘क’ कनिष्ठ लिपिक पदाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनीला रविवार, ३१ ऑक्टोबरच्या गट ‘ड’ पदाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे.

संबंधित विद्यार्थिनीने गट ‘क’मधील कनिष्ठ लिपिक पदाची उत्तर तालिका तपासली असता प्रश्नपत्रिका आणि उत्तरे जुळत नसल्याने तिने शंकेपोटी ३१ ऑक्टोबरला झालेल्या गट ‘ड’ पदाची तिच्या मित्राची प्रश्नपत्रिका तपासली असता हा संपूर्ण प्रकार समोर आला. यामुळे आरोग्य विभागाच्या गट ‘ड’चा पेपर हा २४ ऑक्टोबरलाच बाहेर आल्याने आता संपूर्ण परीक्षेचे नियोजन आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

३१ ऑक्टोबरला झालेल्या गट ‘ड’च्या दुपारच्या सत्रातील परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून सुरू आहेच. याविरोधात पुण्यामध्ये पोलीस तक्रार करण्यात आली असून सायबर विभाग याचा शोध घेत आहे. प्राथमिक तपासात औरंगाबाद येथून पेपर फुटल्याची माहितीही मिळाली आहे. त्यातच अमरावती येथील परीक्षा केंद्रावर ३१ ऑक्टोबरचा पेपर २४ ऑक्टोबरलाच देण्यात आल्याने पेपर फुटीच्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. याविरोधात संबंधित विद्यार्थिनीने आरोग्य आयुक्तालयात लेखी तक्रार केली असून, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्याय द्यावा अन्यथा संबंधितांविरोधात पोलीस तक्रार दाखल करून न्यायालयातही दाद मागेल, असा इशारा तिने दिला आहे.

आठ दिवसांआधीच पेपर फुटल्याचे उघड

संपूर्ण प्रकरण असे… तक्रारकत्र्या विद्यार्थिनीची २४ ऑक्टोबरला आरोग्य विभागाची गट ‘क’ कनिष्ठ लिपिक (पोस्ट कोड २३) या पदाची परीक्षा तक्षशीला महाविद्यालय अमरावती, परीक्षा केंद्र कोड १२१२ येथे झाली. या पदाची उत्तर तालिका आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर २९ ऑॅक्टोबरला प्रसिद्ध झाली. यावेळी संबंधित विद्यार्थिनीने संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या व सोडवलेली उत्तर तालिका (ओएमआर अॅतन्सर शिट) तपासली. यावेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या व विद्यार्थिनीने सोडवलेल्या उत्तर तालिकेवरील उत्तरांचा ताळमेळ जुळत नव्हता. ३१ ऑक्टोबरला गट ‘ड’ पदाची परीक्षा झाली. संबंधित विद्यार्थिनीने तिच्या एका मित्राचा ३१ ऑक्टोबरचा पेपर बघितला. यावेळी तिच्या लक्षात आले की, २४ ऑक्टोबरला देण्यात आलेली प्रश्नपत्रिका व तिच्या मित्राला ३१ ऑक्टोबरला मिळालेली प्रश्नपत्रिका या दोन्हीमध्ये पूर्ण साम्य आहे.