वर्धा : असे एकही घर नसेल जिथे प्लास्टिक वापर होत नसेल. प्रामुख्याने घरातील एक घर स्वयंपाकघरात तर पदोपदी प्लास्टिक भांड्यांचा वापर होत असतो. साठवणे, भिजवणे,खाणे, मळणे व अन्य माध्यमातून प्लास्टिक भांडी वापरल्या जातात. पण हे प्लास्टिक किती घातक याचा प्रचार पण मोठ्या प्रमाणात होऊनही प्लास्टिक घरातून हलत नाहीच. हा धोका टाळण्यासाठी किमान स्वयंपाकघर तरी प्लास्टिकमुक्त ठेवा, असे जागरण सूरू झाले आहे.

बहार नेचर फाउंडेशनच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण वर्षभर विविध विषयांवर व्याख्याने होणार आहेत. २६ सप्टेंबर रोजी झालेल्या वेबिनारकरिता आहारातज्ञ् सना पंडीत नागपूर यांनी प्लास्टिक मुक्त स्वयंपाकघर या विषयावर मार्गदर्शन केले. प्लास्टिक च्या अतिवापरामुळे कॅन्सर सारख्या रोगांमध्ये वाढ होताना आपल्याला दिसते आहे. तरीही प्लास्टिक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. हॉटेल मधून सर्रास प्लास्टिक मध्ये गरम अन्न दिल्या जाते व ते अन्न आपण ग्रहण करतो यात हे प्लास्टिक आपल्या शरीरात प्रवेश करते. प्लास्टिक तयार करतांना कॅरसीनोजेन्स  हे केमिकल्स वापरल्या जाते. ते कॅन्सर निर्मितीस पूरक ठरते. कॅन्सर म्हणजे शरीरातील पेशिंची अनियंत्रित वाढ होय. म्हणूनच कॅन्सरच्या काही प्रकारांना करसीणोमा म्हटल्या जाते. ते टाळायचे असेल तर प्रथम स्वयंपाकघरातून प्लास्टिक हद्दपार करा, असा सल्ला पंडित यांनी दिला.

नुकत्याच एका संशोधनात आईच्या दुधात प्लास्टिक आढळले आहे त्यामुळे ही अतिशय गंभीर बाब आहे, असे त्यांनी नमूद केले. प्लास्टिक कंटेनरमध्ये बाहेरून येणारे अन्न हे धोक्याचे.  या वेबिनारमध्ये त्यांना एक प्रश्न झाला की आता सरसकट प्लास्टिक भांडी ठाण मांडून आहेत. त्या फेकून देत नव्याने स्वयंपाकघर उपयुक्त करायचे झाल्यास किती खर्च येणार. केवळ २० हजार रुपयाच्या धातूची भांडी आणून किचन परिपूर्ण करता येईल. स्वयंपाकघरात फक्त डस्टबिन प्लास्टिकचे राहू शकते, असे गंमतीत त्यांनी सांगितले. कोणत्याच स्वरूपात प्लास्टिक वापर करू नका, असा कळकळीचा सल्ला त्यांनी दिला. मार्गदर्शन करतांना पंडित यांनी नमूद केले की प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे किचन हे प्लास्टिकमुक्त आहे. ते ग्राहकांची एव्हढी काळजी घेतात तर तुम्ही स्वतःच्या कुटुंबाची काळजी कां घेत नाही, असा प्रश्न करीत त्यांनी अंतर्मुख केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालरोगतज्ञ डॉ. जयंत वाघ होते, यावेळी बहारचे अध्यक्ष डॉ. बाबाजी घेवडे, उपाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, सचिव जयंत सबाने व इतर सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन दर्शन दुधाने यांनी केले.