नागपूर: नागपूर जिल्ह्यातील रामटेक या पर्यटन स्थळी प्रतिबंधात्मक गुटखा, तंबाखू, पान मसाला या पदार्थाची सर्रास विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) अन्न शाखेच्या अधिकाऱ्यांनी येथील एका किराना दुकानावर छापा टाकला. या कारवाईबाब आपण जाणून घेऊ या.
एफडीए, अन्न शाखेच्या नागपूर कार्यालयातील गुप्तवार्ता विभागास नगरधन, ता. रामटेक येथील नासरे किराणा अँड जनरल स्टोअस, कीला रोड, नगरधन, ता. रामटेक, जि. नागपूर व मे. अभिलाष किराणा अँड जनरल स्टोअस, कीला रोड, नगरधन, ता. रामटेक, जि. नागपूर या दोन किराणा दुकाणात प्रतिबंधात्मक वस्तूंची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून एफडीएच्या दोन चमूने शिताफीने एकाच वेळी दोन्ही दुकानावर छापा टाकला. या दोन्ही दुकानात पथकांना प्रतिबंधात्मक सुगंधित तंबाखू, पान मसाला, गुटखा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी साठवण्यात आल्याचे निदर्शनात आले.
दोन्ही कारवाईमध्ये एफडीएच्या गुप्तवार्ता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी ललित सोयाम, राजेश यादव आणि रावसाहेब वाकडे यांचा समावेश होता. यावेळी मे. नासरे किराणा अँड जनरल स्टोअसमध्ये १९ प्रकारचे एकूण १३७.८७ किलो सुगंधित तंबाखू जप्त केला गेला. त्याची किंमत १ लाख २९ हजार ४१८ रुपये होती. या प्रकरणात दुकानाचे मालक शंकर रामाजी नासरे (५५) आणि अक्षय शंकर नासरे यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत कारवाही केली गेली.
दुसऱ्या प्रकरणात मे. अभिलाष किराणा अँड जनरल स्टोअर्स, नगरधन या दुकाणावर छापा टाकला असता ११९.५४ किलो प्रतिबंधात्मक तंबाखू, पान मसाला व इतरही प्रतिबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या. हा मुद्देमाल ९८ हजार ११५ रुपयांचा होता. या प्रकरणातही दुकान मालक अभिलाष राधेश्याम वाघमारे यांच्याविरोधात अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत कारवाही केली गेली. सुगंधित तंबाखू व पान मसाला हा मानवी शरीरावर अपायकारक परिणाम करणारे आहे. त्यामुळे कर्करोगासारखे दूर्धर आजार व मृत्यूस निमंत्रण मिळण्याचा धोका आहे. त्यानंतरही या प्रतिबंधात्मक वस्तूंची काही दुकानदार अवैध विक्री करतात. या विक्रेत्यांची माहिती देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न शाखेकडून दिली गेली. दरम्यान नागरिकांनी या विक्रेत्यांची नावे कळवण्याचे आवाहनही एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.