scorecardresearch

उपराजधानीत रस्त्यावरील हातठेले झाले ‘मिनी बार’!, महापालिका-पोलीस पथकांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष

शहरातील अनेक भागात असणारे चायनीज ठेले व अंडाभूर्जीच्या ठेल्यांवरून ग्राहकांना दारू पिण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

nl mini bar
उपराजधानीत रस्त्यावरील हातठेले झाले ‘मिनी बार

अनिल कांबळे

नागपूर : शहरातील अनेक भागात असणारे चायनीज ठेले व अंडाभूर्जीच्या ठेल्यांवरून ग्राहकांना दारू पिण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. प्रामुख्याने ‘वाईन शॉप’ लगतच्या ठेल्यांवर असे प्रकार सर्रास चालत आहेत. त्यामुळे गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचे चित्र आहे. महापालिका आणि पोलिसांचे पथक हातठेल्यावाल्यांकडून वसुली करीत असल्याने आता शहरातील प्रत्येक रस्त्यावरील ‘मद्यालये’ मद्यपींना मद्याची सुविधा देत असल्याचे चित्र आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरच ‘मिनी बार’ थाटले आहेत. अनेक जण दारूच्या दुकानातून दारूची बाटली घेऊन रस्त्यावरच एखाद्या हातठेल्यावर दारू पित बसतो. विशेष करून युवा वर्ग हातात बियरच्या बाटल्या घेऊन रस्त्याच्या कडेला किंवा फुटपाथवर ढोसत बसतात. अंडाभूर्जी किंवा आमलेट बनवणारा हातठेला चालक दारूचे प्लास्टिकचे ग्लास आणि थंड पाण्याची बाटली उपलब्ध करुन देत असल्यामुळे शहरात ‘मिनी बार’ची संख्या वाढली आहे. हातठेल्यावर दारू पिणाऱ्यांमध्ये मोठा वर्ग हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांचा आहे. दारू पित रस्त्यावर लोकांनी शिवीगाळ करणे किंवा हातठेलावाल्यांना तोडफोड करण्याची धमकी देत रात्री एक ते दीड वाजेपर्यंत हुल्लडबाजी करताना दिसतत. पोलिसांचेही महिन्यांचे अर्थपूर्ण संबंध हातठेलेवाल्यांशी असतात. त्यामुळे दारूड्यांना कुणीही हटकत नाही. परंतु, पोलिसांच्या वसुली धोरणामुळे अशा हातठेल्यांवरच वाद होऊन हत्येसारख्या गंभीर घटनाही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एवढेच नाही तर अनेक प्रकरणांमध्ये गुन्हेगारी कट अशा गुत्थ्यांवर शिजत असल्याचेही अनेक प्रकरणांमध्ये दिसून आले आहे. आजवर पोलिसांकडून थातूरमातूर कारवाई केली जात होती. पण, यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीच लक्ष घालून अवैध गुत्थे बंद करण्याचे गरज निर्माण झाली आहे.

ढाबा-सावजीमध्ये दारूची सुविधा

सध्या शहतील ८० टक्के सावजीमध्ये दारूची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. सावजी भोजनालय, हॉटेल्स, ढाबे आणि लहान हॉटेल्समध्येसुद्धा दारू पिण्याची मुभा आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी दारू पिणारे किंवा हातठेल्यावर दारू पिणाऱ्यांसह सावजीमध्ये दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेक सावजी भोजनालयाचे हप्ते बांधलेले आहेत. त्यामुळे मध्यरात्री एक ते दोन वाजेपर्यंत सावजी ढाबे उघडे असतात. त्यांच्यावर पोलीस अर्थपूर्ण संबंधामुळे कारवाई करीत नसल्याची माहिती आहे.

पोलिसांची गस्तप्रणाली वाऱ्यावर

हातठेल्यावर दारू पिऊन उपद्रव करणाऱ्या मद्यपींवर कारवाई करण्यात येत नसल्याने दिसून येते. हातठेल्यावर दारू पिणाऱ्यांमध्ये सर्वाधिक अल्पवयीन मुलांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. पोलीस अंमलदार फक्त नावापुरतीच गस्त घालतात. हातठेलेवाल्यांकडून स्वतः अंडाभूर्जी किंवा आमलेट खाऊन त्याला अभय देत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणे गुन्हा आहे. हातठेलेवाल्याजवळ दारूड्यांची गर्दी होऊ नये म्हणून गस्त वाढवण्यात येईल. रस्त्यावर किंवा हातठेल्यावर दारू पिणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

– मनोज सिडाम, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 22:22 IST

संबंधित बातम्या