बुलढाणा : महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र युती सरकार मात्र फक्त घोषणाबाजी करत आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो काढून परतले पण मदतीची घोषणा केली नाही. आता मुख्यमंत्री दिल्लीत गेले पण तिथे त्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी सुरजागड लोखंड खाणीसंदर्भात चर्चा केली हे अत्यंत संतापजनक असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून भरीव पॅकेज घेऊनच परत यावे, अन्यथा तेथेच थांबावे, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी आज शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील कामखेड, गुळभेली, राहेरा, दाभोळ तांडा नळकुंड, व बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट, पाडळी गावांमध्ये अतिवृष्ठी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे, आमदार धीरज लिंगाडे होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपा सरकारवर टीकेची तोफ डागली. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये, तसेच जमीन खरवडून गेली त्यासाठी एकरी २ लाख रुपये द्यावेत, रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत द्यावेत, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागण्या काँग्रेस पक्षाने केल्या आहे.
सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून हेक्टरी ३ हजार रुपयेही शेतकऱ्यांच्या पदरात पडणार नाहीत. याकडे लक्ष वेधण्यासाठी ३ ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन करणार असल्याची घोषणा सपकाळ यांनी केली.
अजितदादांचे विधान निर्लज्जपणाचे
काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना नेहमीच मदत दिली मग आताच्या सरकारलाच काय अडचण आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पैशाचे सोंग आणता येत नाही, या अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाचा समाचार घेत, त्यांना लाज वाटली पाहिजे. अदानीच्या फाईलवर सही करताना, ८८ हजार कोटी रुपयांच्या शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देताना त्यांना हे सुचत नाही का? असा रोखठोक प्रति सवाल सपकाळ यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणालातरी वादग्रस्त वक्तव्य करायला लावून ज्वलंत प्रश्नावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत असतात. आता भिडेंचे किडे वळवळले असून हा सुद्धा शेतकऱ्यांच्या मुळ प्रश्नांपासून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न असू शकतो. पण भिडे हिजडे कोणाला म्हणाले, दांडिया खेळणारे तर हिंदूच आहेत, त्यांनाच भिडेंनी हांडगे म्हटले आहे का? असा प्रतिप्रश्न सपकाळ यांनी केला .
कल्याण मधील ७२ वर्षांच्या दलित काँग्रेस कार्यकर्त्याला जातीवाचक शिवीगाळ करून अशोभनीय कृत्य केले आहे. हे गुंड भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्या गावातीलच आहेत यावरून भाजपाची संस्कृती काय आहे हे स्पष्ट होते. या गुंडांवर कठोर कारवाई केली पाहिजे ही काँग्रेसची मागणी आहे. काँग्रेस पगारे या कार्यकर्त्याच्या पाठीशी असून त्यांचा लवकरच गौरवही केला जाणार असल्याचे सपकाळ म्हणाले.