चंद्रपूर: घुग्घुस परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे  सोमवारी १ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता वेकोलीची वणी क्षेत्रातील निलजाई खाण परिसरात अपघात झाला. उकनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेला ढिगारा अचानक कोसळला. मातीचा मलबा  वेगाने रस्त्यावर आला. त्यामुळे  एक स्कॉर्पियो आणि १८ चाकांचा ट्रक पूर्णपणे मातीत गाडला गेला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून दृश्ये सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॉर्पियोमध्ये चार युवक प्रवास करीत होते. ते कसाबसे गाडीच्या मागच्या दरवाजातून बाहेर पडले आणि जीव वाचवला. हे सर्व युवक उकनी गावातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र गाडी पूर्णपणे मातीखाली दबली गेली. त्याचप्रमाणे, मलब्यात अडकलेला १८ चाकांचा ट्रक वंदना ट्रान्सपोर्टचा आहे. अपघातानंतर निलजाई-घुग्घुस मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. दुसऱ्या पाळीतील खदान कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाने पर्यायी मार्गाने  बसमधून घरी पाठवले.  सध्या रस्त्यावरून वाहतूक ठप्प आहे. वेकोलि व्यवस्थापनाने तत्काळ मलबा हटवण्याचे काम सुरू केले आहे. जड यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मातीचा डोंगर हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र सततच्या पावसामुळे कामात अडचणी येत आहेत. अधिकारी लवकरात लवकर मार्ग सुरू करण्याचे प्रयत्न करीत आहे,असे असल्याचे सांगण्यात आले.  पावसाळ्यात खाण  परिसरात सुरक्षा आवश्यक आहेत. सुदैवाने स्कॉर्पियोतील युवक वेळेत बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली.