चंद्रपूर : राज्यातील आठ ते दहा जिल्ह्यांना अतिवृष्टी व पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांसाठी तातडीने २ हजार कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. तसेच प्रभावित कुटुंबांना तात्काळ १० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जिल्हाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पुढचे दोन ते तीन दिवस “अलर्ट मोड” वर राहून काम करावे, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रविवार २८ सप्टेंबर रोजी कौटुंबिक कामासाठी मूल येथे आले असता माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील पूर परिस्थितीवर पूर्ण लक्ष असल्याची आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत केली जात असल्याची माहिती दिली. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, राज्यातील संपूर्ण परिस्थितीची पाहणी व पंचनामे झाल्यानंतर अधिकची मदत शेतकरी व नागरिकांना दिली जाईल. महाराष्ट्रात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे ही वस्तुस्थिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केली.
राज्यातील पूर परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. प्रशासनाकडून विविध ठिकाणी मदत व बचावकार्य सुरू आहे.प्रत्येक नागरिकांची काळजी सरकारकडून घेतली जात आहे. पूरग्रस्तांसाठी कॅम्पमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून जनावरांसाठी चारा व छावणीची सोय करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले की, पूरग्रस्तांसाठी तातडीने २००० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून प्रभावित कुटुंबांना तात्काळ १० हजार रुपयांची मदत दिली जात आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.फडणवीस यांनी स्पष्ट केले की, संपूर्ण पाहणी व पंचनामे झाल्यानंतर अधिकची मदत शेतकरी व नागरिकांना दिली जाईल. उद्या सोमवार आणि मंगळवारचा दिवस खूप महत्वाचा आहे. सलग तीन दिवस हवामान खात्याने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला असल्याने जिल्हा प्रशासनाला अलर्ट मोड वर राहण्याचे निर्देश दिले आहेत. दोन तीन दिवसानंतर बंगालच्या उपसागरातील वादळ कमी होईल आणि त्यानंतर परतीचा पाऊस सुरू होईल. तेव्हा आगामी तीन दिवस महत्वाचे आहेत असेही फडणवीस यांनी सांगितले.