नागपूर : जून महिना संपत आला असताना अखेर मान्सूनने विदर्भात सलामी दिली. विदर्भात मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहेत. उपराजधानीसह अमरावती, चंद्रपूर आदी जिल्ह्यांत काही ठिकाणी संथ तर काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

भारतीय हवामान सातत्याने मान्सूनच्या आगमनाचे वेगवेगळे संकेत देत होते. त्यातच ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने मान्सूनची वाट अडवली. महाराष्ट्रात उशिरा दाखल झालेला मान्सून जूनचा उत्तरार्ध येऊनही तळकोकणातच मुक्काम ठोकून होता. विदर्भात २३ जूनपासून मान्सून हळूहळू प्रवेश करेल असा अंदाज होता. मात्र, २३ पासून मान्सून राज्य व्यापणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आणि पहिल्यांदा तो खरा ठरला.

हेही वाचा – ‘एमपीएससी’कडून लघुलेखक परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या समोरचे आव्हान काय?

गुरुवारी रात्रीपासूनच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. अमरावती जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज पाऊस थांबला असला तरी आभाळी वातावरण आहे. तर चंद्रपुरातही काल रात्री पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. नागपूर शहरातही दुपारी काही भागांत पाऊस कोसळला. तर रात्रीदेखील पावसाने वर्दी दिली. आज सकाळपासून नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली.

हेही वाचा – “आमच्याकडे मोदी, तुमचा नेता कोण?” पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीवरून मुनगंटीवारांचा सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाशीम जिल्ह्यात मात्र अजूनही पावसाची प्रतिक्षाच आहे. वर्धा जिल्ह्यातदेखील ढगांच्या गडगडाटासह रिमझिम पाऊस सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातही गुरुवार सायंकाळपासून जोरदार पाऊस आहे. आज पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाने सकाळी उसंत घेतली, मात्र ढगाळ वातावरण आहे.