अमरावती : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचा दावा करण्यात येत असतानाच अनेक शेतकऱ्यांसमोर या महामार्गाने अडचणी निर्माण केल्या आहेत. काही शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते नाहीत, तर महामार्गामुळे पाण्याचा निचरा न होण्याच्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत. त्यातच महामार्गाच्या कामामुळे अप्पर वर्धा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील ३६० हेक्टर, तर कोहळ लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या क्षेत्रातील २२६ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे.

अप्पर वर्धा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावरील धामणगाव व चांदोरा रेल्वे तालुक्यातील पाटचऱ्या आणि कालव्यांचे समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी सामग्रीच्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील प्रकल्प, अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चांद नदी प्रकल्प आणि वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुका बोर मोठा प्रकल्प तसेच पंचधारा मध्यम या प्रकल्पांतर्गत देखील कालवे, लघु कालवे, लघुपाट अंशतः बाधित झाले आहेत. समृद्धी महामार्गाच्या बांधकामामुळे उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे अंदाजे ३६० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे, तर कोहळ लघु पाटबंधारे योजनेच्या लाभक्षेत्रात अंदाजे २२६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

हेही वाचा : खळबळजनक…बलात्काराच्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी देऊन महिलांनी मागितली खंडणी

चांदी नदी प्रकल्पावर समृद्धी महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे मुख्य कालव्याच्या शेवटच्या टोकाकडील काही क्षेत्र सिंचनापासून वंचित आहे. बोर व पंचधारा मध्यम प्रकल्पांतर्गत अंशतः बाधित क्षेत्र आहे. बाधित कामांच्या दुरुस्तीची कामे प्रगतिपथावर आहेत व दुरुस्ती झालेल्या कामाच्या अनुषंगाने सिंचन करण्यात येत आहे, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.अप्पर वर्धा प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या वितरण प्रणालीची दुरुस्ती करण्यासाठी जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व समृद्धी महामार्गाच्या कामाशी संबंधित कंत्राटदारादरम्यान २०१९ मध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता.

हेही वाचा : नागपूर : उपमुख्यमंत्र्यांच्या शहरातील खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘यमराज’ अवतरले रस्त्यावर

त्यानुसार सप्टेंबर व ऑक्टोबर २०२० दरम्यान, एकूण चार वेळा संयुक्त पाहणी करण्यात आली. बाधित कामांपैकी काही कामे दुरुस्त करण्यात आली असून काही कामे तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण असल्याने जून व जुलै २०२१ मध्ये पुन्हा तपासणी करण्यात आली. गेल्या जून महिन्यात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार पुन्हा नव्याने संयुक्त पाहणी करून वितरण प्रणाली दुरुस्तीची कामे करणे नियोजित असल्याचे सांगण्यात आले आहे.

“तू चुकीच्या पक्षात आहेस, काँग्रेसमध्ये ये”, मित्राच्या ऑफरनंतर नितीन गडकरी म्हणाले होते…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांदी नदी प्रकल्पावरील कालव्यांच्या कामाला रस्ते विकास महामंडळाने सुरुवात केली आहे. वर्धा जिल्ह्यातील बोर मोठा प्रकल्प व पंचधारा मध्यम प्रकल्पाच्या बाधित कामास समृद्धी महामार्गाच्या यंत्रणेने मान्यता देऊन कालवा छेदलेल्या ठिकाणची ९० टक्के कामे पूर्ण केली असून उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. समृद्धी महामार्गामुळे ज्या ठिकाणी कालवे बाधित झाले आहेत त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी व्यवस्था करून सिंचन करण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. सिंचनाचे क्षेत्र बाधित झाल्याने शेतकऱ्यांसमोर आता अडचणी निर्माण झाल्या आहेत. कालवे, पाटचऱ्यांची दुरुस्ती आणि इतर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आव्हान रस्ते विकास महामंडळ आणि जलसंपदा विभागासमोर आहे.