नागपूर : आई वडील, कुटुंबाचा सहवास लाभला तर कोवळ्या वयातील मुले वाईट मार्गाला लागत नाहीत. पण तो लाभला नाही तर अशी मुले गुन्हेगारी विश्वासाच्या दलदलीत लोटली जातात, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र त्याला छेद देणारे वास्तव राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने जारी केलेल्या अहवालाच्या अभ्यासातून दिसत आहे.
बालगुन्हेगारीच्या पिंजऱ्यात अडकलेल्या बेघर आणि अनाथांच्या तुलनेत बहुसंख्य बालके आई- वडिलांच्या सहवासात कुटुंबातच वाढलेली असल्याचे स्पष्ट होते. बेघ र, अनाथ मुलांकडून घडलेल्या गुन्ह्यांची संख्या नगण्य आहे.
२०२३ मध्ये १८ वर्षांच्या आत घडलेल्या एकूण दखलपात्र गुन्ह्यांपैकी ९९५ बालकांचा समावेश होता. यात ९३१ बालगुन्हेगारांचा अपहरणात प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष समावेश आढळला. अजाणतेपणाने केलेल्या मुलींवर अत्याचारामुळे बलात्काराच्या प्रकरणात ९७७ बालकांवर गुन्हे दाखल झाले. राज्यातील एकूण बाल गुन्हेगारांपैकी मुंबईत २९०, नागपुरात २५४ तर पुण्यात २७५ बालगुन्हेगार होते.
प्रत्यक्ष खुनाच्या प्रकरणात राज्यात १४५ बालके दोषी आढळली. राज्यातील तीन महानगरांपैकी २०२३ या वर्षात मुंबईतून ८, पुण्यातून ११ तर नागपुरातून ६ बालगुन्हेगारांचा प्रत्यक्ष खुनात सहभाग आढळला. मानवी शरीरावर हल्ला केल्याच्या भारतीय न्याय संहितेच्या दखलपात्र फौजदारी कायद्याच्या कलमांखाली २०४२ प्रकरणांमध्ये १८ वर्षांच्या आतील २५३० बालकांलर राज्यात गुन्हे दाखल झाले.
चोरी, दरोड्यात नागपुरातील गुन्हेगार पुढे
चोरी आणि दरोड्या सारख्या गंभीर दखलपात्र गुन्ह्यांत राज्यात १८९२ बालगुन्हेगार अडकले. यात राज्यातील तीन महानगरांपैकी नागपुरातून सर्वाधिक ७९, पुण्यातून ५९ तर मुंबईतून ४६ बालगुन्हेगार चोरी प्रकरणात गुन्हेगार झाले. दरोड्याच्या गुन्ह्यात नागपुरातून १९, पुण्यातून २८ तर मुंबईतून १७ बालगुन्हेगार आरोपीच्या पिंजऱ्यात उभे झाले.
राज्यातील ३ वर्षांची सरासरी सारखीच
देशभरात २०२३ या वर्षात राज्यात बालगुन्हेगारीची ५,५७३ प्रकरणे पोलीस डायरीवर नोंदवली गेली. त्या आधीच्या २०२२ या वर्षात ही संख्या ४५४६ तर त्यापूर्वी २०२१ मध्ये ४५५४ इतकी होती. तीन वर्षांची सरासरी काढली तर राज्याच्या बालगुन्हेगारी दर सारखाच असल्याचे स्पष्ट होते.