एकीकडे पाच राज्यातील निवडणुकीतील विजयाचा गुलाल उधळला जात असताना सोमवारी बुरा न मानो होली है.. म्हणत राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वजण सप्तरंगात न्हायला आणि इतरांनाही न्हाऊ घालायला सज्ज झाले आहे. बाजारपेठा बंद असल्यामुळे सुटीचा फायदा घेत दुपारपासून शहरातील विविध भागात होळीचा माहोल असताना विविध भागात आणि वस्त्यांमध्ये सायंकाळी होळ्या पेटवण्यात आल्या.

शहरातील विविध भागात दुपारनंतर धूलिवंदनाचा माहोल सुरू झाला. शहरातील विविध भागात धूळवडीच्या विविध साहित्यांनी दुकाने सजली होती. यावर्षी रासायनिक रंग मोठय़ा प्रमाणात विक्रीला आले असले तरी लोकांचा कल गुलाल आणि हर्बल रंगाकडे दिसून येत आहे. मात्र, तो बाजारात पाहिजे त्या प्रमाणात विक्रीला नाही. घरोघरी लहान मुले रंगपंचमीची तयारी करीत असताना दुसरीकडे रंग आणि स्टाईलिश पिचकाऱ्यांचा बाजारही ऐन रंगात आला आहे. इतवारी, महाल, सक्करदरा, गोकुळपेठ, सीताबर्डीवरील बाजारपेठा रंग पिचकाऱ्या टपऱ्या स्टॉल्सने गजबजून गेल्या आहेत. धूलिवंदनाचा माहोल शहरात दिसू लागला आहे. शहरातील मोठी बाजारपेठ असलेल्या इतवारीत बाजारपेठा बंद असल्यामुळे सकाळपासून धूलिवंदनाचा माहोल सुरू झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रांसह अनेक अभिनेत्यांची छायाचित्रे असलेल्या पिचकाऱ्यांसह विविध फळे, बंदूक, मनी बँक, क्रिकेटच्या बॅटची प्रतिकृती असलेल्या पिचकाऱ्या बाजारात दिसून आल्या. गुलाल, पाण्याचे रंग, डबीतील द्रवरूप रंग, रोडोमेन, गोल्डन, स्टार्च रंग यांची खरेदी गेल्या वर्षी चांगली आहे. यावर्षी या रंगांना मागणी आहे. जर्मनीचे रंग बाजारात आले आहेत. सात वेगवेगळ्या अत्तराच्या फ्लेव्हरमध्ये जर्मनीचे रंग ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. पिचकाऱ्यांमध्ये चायनीज पिचकाऱ्यांचा बोलबाला असून मिकी माऊसचे चित्र असलेली ऑक्सिजन टँक पिचकारी ही बच्चेकंपनीचे खास आकर्षण ठरली आहे. मशिनगन असलेली पिचकारी सर्वात महाग असून त्यात एक ते दीड लिटर रंग भरला जातो. महाल, इतवारी, सक्करदरा, गोकुळपेठ आदी भागात सकाळपासूनच एकमेकांना रंग लावणे सुरू करण्यात आले. नैसर्गिक रंगाचा प्रचार आणि प्रसार करून जनजागृती केली जात असली बाजारात मात्र रासायनिक रंगांशिवाय दुसरे कुठलेही रंग दिसत नाही. वेगवेगळ्या पानाफुलांपासून किंवा बी-बियाण्यांपासून प्रदूषणमुक्त तयार करण्यात आलेल्या रंगामुळे त्वचा खराब होत नाही. मात्र, हे रंग बाजारात मिळत नसल्याची तक्रार अनेक लोकांनी केली. त्यामुळे रासायानिक रंग विकत घेण्याशिवाय लोकांना पर्याय नाही. काही सामाजिक संस्थांनी रंग तयार केले आहे, परंतु ते बाजारपेठेत पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाही.

प्रदूषणमुक्त होळी साजरी करा -बावनकुळे

होळी हा सर्वाचा आनंदाचा सण आहे. या सणाची अनेक जण आतुरतेने वाट पहात असतात. प्रत्येकाने हा आनंदाचा आणि भेटीचा सण साजरा करावा, पण कोणतेही प्रदूषण होणार नाही, पाण्याची नासाडी होणार नाही, याची जाणीव ठेवून प्रदूषणमुक्त होळी साजरी करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्य़ातील आणि शहरातील नागरिकांना केले आहे. होलिकोत्सव साजरा करताना आपल्या भागातील कचरा, वाईट प्रवृत्तीचा नाश करा, होळीसाठी झाडाची कत्तल करणे योग्य नाही. कोणतेही प्रदूषण आणि कुणास त्रास, इजा होणार नाही, याची दक्षताही नागरिकांनी घ्यावी. रासायनिक द्रव्ये मिसळलेले रंग वापरू नका, कोरडय़ा गुलालाने रंगपंचमी साजरी करा. पाण्याचे महत्त्व लक्षात घेता पाण्याची नासाडी होणार नाही, याची काळजी घेत कोरडय़ा गुलालाचा वापर करा. आनंदाच्या या सणांचा सर्वानी आनंद घ्या, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.