नागपूर : मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपामुळे गृहमंत्रिपद गमवावे लागलेले व तुरुंगवास भोगणारे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि या प्रकरणावरून देशमुख यांना लक्ष्य करणारे तत्कालीन विरोधी पक्षनेते व विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सत्ताबदलानंतर प्रथमच शुक्रवारी काटोलमध्ये एका सरकारी बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले.

शुक्रवारी काटोलमध्ये पोलीस ठाण्याचे उद्घाटन व तालुक्याची आढावा बैठक होती. त्याला पालकमंत्री म्हणून फडणवीस तर त्या भागाचे आमदार म्हणून अनिल देशमुखही उपस्थित होते. या दोन्ही कार्यक्रमात फडणवीस-देशमुख यांचे व्यक्तिगत बोलणे झाले नाही. मात्र बैठकीत बोलताना फडणवीस यांनी देशमुखांनी केलेल्या सूचनांचा उल्लेख केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात देशमुख यांचे मंत्रिपद सिंग यांच्या आरोपामुळे गेले होते व त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. या सर्व प्रकरणामागे भाजपाचाच हात असल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणामागचा ‘मास्टर माईंड’ कोण हे सर्वांना ज्ञात असल्याचा दावा देशमुख यांनीही तुरुंगाबाहेर आल्यावर केला होता.

हेही वाचा – नागपूर : कॉंग्रेसमधून निलंबित आशीष देशमुख यांच्या निवासस्थानी फडणवीस

अलीकडेच परमबीर सिंग यांचे निलंबनही मागे घेण्यात आले. यावर प्रतिक्रिया देतानाही देशमुख यांनी भाजपावर आरोप केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी फडणवीस आणि देशमुख हे आजी-माजी गृहमंत्री काटोलमध्ये एका व्यासपीठावर आले. ते परस्परांशी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. पण त्यांनी व्यक्तिगत बोलणे टाळले. दोघेही वेगवेगळ्या सोफ्यांवर बसले होते.

हेही वाचा – नागपूर : सरकारी बैठकांसोबत भाजपाचे मेळावेही, फडणवीसांच्या मनात काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आढावा बैठकीत बोलताना देशमुख यांनी महाविकास आघाडीच्या काळात मतदारसंघात झालेल्या कामाची माहिती दिली. कोणती कामे प्रलंबित आहेत, याची माहितीही दिली. फडणवीस यांनीही या कामांचा उल्लेख करीत प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमात एकत्र येऊनही दोन्ही नेते परस्परांशी अंतर राखूनच होते.