सामाजिक न्याय भवनात जागाच नाही

नागपूर : महाज्योतीच्या विभागीय कार्यालयाला सामाजिक न्याय भवनात जागा मिळू न शकल्याने नाशिक विभागीय कार्यालयाचा २८ सप्टेंबरचा उद्घाटन सोहळा बारगळला.

महाज्योतीने औरंगाबादेला २७ सप्टेंबर आणि नाशिक येथे २८ सप्टेंबर रोजी विभागीय कार्यालयाचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित केला होता. त्याआधी सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्तांना महाज्योतीला जागा देण्यासाठी  प्रस्ताव पाठवला. औरंगाबादच्या सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्तांनी तातडीने जागा उपलब्ध करून दिली.

ओबीसी, व्हीजेएनटी आणि विशेष मागासवर्गाच्या उत्थानासाठी स्थापन झालेल्या महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (महाज्योती) विभागीय कार्यालय औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी येथे सुरू करण्यात येत आहे. औरंगाबादच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन २७ सप्टेंबरला झाले. महाज्योतीचे मुख्यालय नागपुरातील सामाजिक न्याय भवनात सुरू झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी, व्हीजेएनटी आणि विशेष मागासवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. हा वर्ग आर्थिकदृष्टय़ा कमकुवत आहे. त्यामुळे महाज्योतीच्या योजनांचा, उपक्रमांचा  लाभ घेण्यासाठी मुख्यालयापर्यंत प्रवास करणे शक्य नाही. सोबतच महाज्योतीच्या योजनांचा प्रचार करण्यासाठी आणि लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचाचा म्हणून विभागीय कार्यालय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद येथे कार्यालयासाठी सामाजिक न्याय भवनात संपूर्ण एक माळा मिळाला आहे. नाशिक कार्यालयाचे उद्घाटन २८ सप्टेंबरला होणार होते. पण, जागा उपलब्ध न झाल्याने ते शक्य झाले नाही. येत्या आठ-दहा दिवसात नाशिक कार्यालयासाठी जागा मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी मंत्री छगन भुजबळ प्रयत्नशील आहेत. नाशिक आणि पुण्याचे कार्यालय एकाचवेळी सुरू केले जातील. त्यानंतर रत्नागिरी कार्यालय सुरू केले जाणार आहे, असे महाज्योतीचे संचालक लक्ष्मण वडले म्हणाले.

नागपूर मुख्यालयालाही जागेची समस्या

महाज्योतीचे मुख्यालय सामाजिक न्याय भवनात आहे. ही जागा समता प्रतिष्ठानची आहे. तिसऱ्या माळ्यावर जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महाज्योतीने सामाजिक न्याय विभागाकडे दिला. परंतु अद्याप जागा मिळालेली नाही.