वर्धा : आर्टिफिसियल इंटीलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच थोडक्यात एआय हा शब्द नव्या तंत्रज्ञानात परवलीचा शब्द ठरला आहे. या तंत्राने यापूढे कारभार चालणार, हे सर्वमान्य झाले आहे. मात्र त्याचा दुरुपयोग कसा व किती वाढत आहे, हे सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या वाघांच्या विविध व्हिडीओतून दिसून येत आहे. पहिले वाघास दारू पाजत असतांनाचा व्हिडिओ आला. त्यानंतर वाघाने वन रक्षकावर हल्ला केल्याचा चांगलाच घुमला. त्यानंतर वाघाने वन रक्षकास जागेवर आणून सोडल्याचा व्हिडिओ आला. आता नुकताच वन रक्षकाने वाघास गोळी मारून ठार केल्याचा व्हिडिओ धूम करीत आहे. हे सर्व व्हिडिओ फेक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या अनुषंगाने चंद्रपूर वन विभागाने स्पष्टीकरण देत नमूद केले आहे की मानव व हिंस्त्र प्राणी यांच्यात संघर्ष वाढत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.त्याचा गैर फायदा असामाजिक तत्व घेत असून त्यामुळे असंतोष वाढत आहे. अश्या एआय तंत्रज्ञान निर्मित व्हिडीओवर विश्वास ठेवू नये असे आवाहन वन खात्याने केले. याची गंभीर दखल घेण्यात येत असून असे फेक व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा ईशारा देण्यात आला आहे. वन किंवा पोलीस खात्यास असे व्हिडिओ निदर्शनास आणून देण्याची विनंती पण चंद्रपूर वन अधिकाऱ्यांनी केली आहे.
हे फेक व्हिडिओ कसे ओळखावे याबाबत लोकं अनभिज्ञ असतात. म्हणून ते ओळखण्यासाठी मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भाटकर यांनी एका पत्रकातून मार्गदर्शन केले आहे. अश्या व्हिडीओतून प्राण्यांचे अनैसर्गिक वर्तन दिसून येते. जे निसर्गात कधीच घडत नाही म्हणजे शिकारी व शिकार एकत्र बसून दिसण्याची बाब. माणसासारखं प्राण्यांचे वर्तन. म्हणजे विशिष्ट पोज देणे. भिन्न प्रजाती म्हणजे अस्वल व हत्ती एकत्र दिसणे. एआय तंत्रज्ञान वापरले असले तरी चुका असतातच. प्राण्यांभोवती अस्पष्ट बाह्यरेषा दिसणे. शरीराचे अववय एकमेकांत मिसळणे. विसंगत प्रतिबिंब, पाणी, पाने याची अनैसर्गिक हालचाल हे प्रकार व्हिडिओ थांबवून विसंगती तपासावी.
फेक व्हिडिओ कसे ओळखावे याबाबत वन्यजीव रक्षक अजिंक्य भाटकर यांनी एका पत्रकातून मार्गदर्शन केले आहे.https://t.co/ZfyIjgKlXt#Fakevideo #howtoidentifyfakevideo #Viralvideo pic.twitter.com/JXyn2j1U18
— LoksattaLive (@LoksattaLive) November 9, 2025
अवास्तव कॅमेरा वर्क दिसते. एखादा अँगल अशक्य असतो. म्हणजे पाठलाग करतांना अचूक ३६० अंशात वळण आढळून येते. अश्या व्हिडिओत अशक्य पण नेहमी उत्तम प्रकाशयोजना, जी खऱ्या जंगलात कधीच दिसत नाही, आढळून येते. आवाज संशयास्पद असतो. तो परिसराशी जुळत नाही. पक्षी किंवा जंगलातील आवाज साचेबद्ध व पुन्हा पुन्हा ऐकू येतात. मुख्य म्हणजे खऱ्या वन्यजीव व्हिडिओत कॅमेरामन किंवा संस्था यांचा तपशील दिला असतो. ठिकाण व प्रजातीची माहिती असते. फेक व्हिडिओत याचा उल्लेख नसतो. जर कोणताही खरा स्रोत सापडला नाही तर तो एआय निर्मित व्हिडिओ असणार. बनावट व्हिडिओत सहसा अस्पष्ट किंवा क्लीकबेट शीर्षके असतात. म्हणजे ‘ सिंहाने हरणास वाचविले ‘ असे. जर तुम्हास हे तर खूपच आश्चर्यकारक आहे, असे वाटले तर ते कदाचित खोटेच असणार.
नेहमी चॅनेलची विश्वासर्हता तपासा. व्हिडीओवरील कॉमेंट्स वाचा. इमेज सर्चचे परिणाम ओळखा. शूटिंग तपशील शोधा. जे चॅनेल रोज प्राण्यांच्या अनेक ‘ दुर्मिळ ‘ भेटीचे व्हिडिओ पोस्ट करतात ते संशयास्पद असतात. जे व्हिडिओ खरे असतात त्याचे सहसा ऑनलाईन अनेक संदर्भ किंवा आवृत्या असतात. स्क्रीन शॉट घेत ते गुगल इमॅजेस वर तपासा, असे आवाहन अजिंक्य भाटकर करतात.
