|| महेश बोकडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आवश्यक आहारतज्ज्ञ उपलब्ध कसे होणार? :- नागपर मेडिकल आणि मुंबईच्या जे. जे. या दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यावर्षीपासून मास्टर्स इन पब्लिक हेल्थ (न्यूट्रिशियन) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. परंतु अभ्यासक्रमाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली नसल्याने त्यात निम्मे प्रवेश झाले नाहीत. या प्रक्रारामुळे राज्यात आवश्यक संख्येने आहार तज्ज्ञ उपलब्ध कसे होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शासनाने पहिल्या टप्प्यात २०१८- १९ या शैक्षणिक वर्षांपासून पूणे, चंद्रपूर, गोंदिया, अकोला, यवतमाळ या सात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये एमपीएच (न्यूट्रिशियन) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला. त्यात नागपूरच्या मेडिकलचा क्रमांक राहणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण खात्याने सांगितले असले तरी वेळेवर नाव वगळण्यात आले. दुसऱ्या टप्यात २०१९- २० पासूनच्या शैक्षणिक सत्रासाठी नागपूरच्या मेडिकल आणि मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात या अभ्यासक्रमाला मंजुरी मिळाली. उशिरा मंजुरी मिळाल्याने प्रवेश प्रक्रियेची माहिती जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली नाही.

दरम्यान, प्रवेशपूर्व परीक्षेतून मेडिकलमध्ये २०  पैकी केवळ ४ जागांवरच प्रवेश प्रक्रिया पार पडली. बऱ्याच जागा रिक्त जाणार असल्याचे बघत मुलाखतीतून प्रवेश प्रक्रियेची परवानगी आरोग्य विद्यापीठाने दिली. त्यातून १८ नोव्हेंबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत केवळ ७ अर्ज आले. या मुलाखतीनंतर सर्व प्रवेश झाल्यावरही येथील प्रवेशाची संख्या ११ हून वर जाणार नाही. या संख्येने मेडिकलच्या डॉ. उदय नारलावार यांनी दुजोरा दिला आहे. मुंबईतही २० पैकी केवळ १२ जागांवरच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे निम्म्याच्या जवळपास जागा रिक्त असतांनाही इच्छुकांपर्यंत माहिती न पोहचल्याने त्यांना हा अभ्यासक्रम करता येणार नाही. हा अभ्यासक्रम करण्यासाठी आरोग्य विद्यापीठातील बीएस्सी नर्सिग, बीपीएमटी, एमबीबीएससह इतर कोणतीही पदवी आवश्यक आहे. नागपूरसह राज्यात आहार तज्ज्ञांची कमी असल्याने या अभ्यासक्रमातून ही संख्या वाढणे अपेक्षित आहे. परंतु या पद्धतीमुळे प्रवेश कमी झाले आहेत.

यूनिसेफकडून मदतीचा हात

राज्यातील एमपीएच न्यूट्रिशियन अभ्यासक्रमासाठी युनिसेफकडून संबंधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना मदत केली जाणार आहे. त्यानुसार तेथे एक पूर्णवेळ न्यूट्रोशियनिस्टची नियुक्ती करून त्याचे वेतन युनिसेफ देईल. येथील अभ्यासक्रमासाठी वर्ग घेणाऱ्या बाहेरच्या व्यक्तीचे मानधन देणे, गेस्ट लेक्चर म्हणून आलेल्या तज्ज्ञाच्या येण्या-जाण्यासह त्याचे राहणे व मानधन देण्याची सोय युनिसेफ करेल. सोबत येथे संगणकासह इतरही पायाभूत सुविधेची मदत युनिसेफ करणार आहे.

चार विभागांचा समन्वय

एमपीएच अभ्यासक्रमासाठी संबंधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील जनऔषधशास्त्र विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, जीवरसायनशास्त्र विभाग या चार विभागांचा समन्वय राहणार आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना समतोल आहार म्हणजे काय, आहाराचे प्रकार, कोणत्या पदार्थातून कोणते घटक शरीराला मिळतात, कुपोषणाची समस्या का उद्भवते हे शिकवले जाणार आहे. मेडिकलमधील या अभ्यासक्रमाचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू होतील.

मुंबईच्या जे.जे. महाविद्यालयात या अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रासाठी २० पैकी १२ जागांवर प्रवेश झाला आहे. ही संख्या कमी असली तरी पुढच्या  सत्रात ती वाढण्याची आशा आहे.’’ – डॉ. ललित संख्ये, जे.जे. रुग्णालय, मुंबई.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hph nutrishion study akp
First published on: 22-11-2019 at 00:55 IST