लोकसत्ता टीम

नागपूर : नागपूर हे देशातील केंदस्थानी असलेले शहर. याच शहराचे लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे नितीन गडकरी देशाचे रस्ते, महामार्ग खात्याचे मंत्री आहेत. त्यांच्या कामाचे विरोधी पक्षातील नेत्यांकडून कौतुक केले जाते. मात्र त्यांच्या स्वतःच्या शहरातील रस्त्यांबाबत लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ती वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन करून व्यक्त केली जात आहे.

उत्तर नागपुरातील उप्पलवाडी क्षेत्रातील रस्त्याच्या समस्येमुळे त्रस्त नागरिकांनी पाणी साचलेल्या खड्ड्यांमध्ये सडकेवर उभे राहून मानव – श्रृंखला करीत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमात माधव नगर, दत्तात्रय नगर, गोविंद गड, एस.आर.ए. संकुल, उप्पलवाडी येथील नागरिक सहभागी झाले होते.

आणखी वाचा-केंद्रात, राज्यात भाजप सत्तेत, पण नागपुरात ‘इनकमिंग’ काँग्रेसमध्ये!

उप्पलवाडी परिसरातील सर्वच वसाहतींमध्ये रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झालेली असून सर्वत्र कच्च्या रस्त्यांवर पाणी साचून किचड साचलेला आहे. माधवनगर पावर हाऊस पासून महापालिकेच्या एस.आर.ए. संकुल पर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून पाणी साचलेल्या खड्डेमय रस्त्यातून नागरिकांना जीव मुठीत घेऊन रहदारी करावी लागत आहे. या खड्ड्यांत वाहनधारक पडून अनेकांना दुखापत झालेली आहे. या रस्त्यावर नेहमीच अपघाताची भीती राहते.

एस.आर.ए. संकुल रस्त्यासह परिसरातील वसाहतीत पक्क्या रस्त्यांच्या निर्मितीची मागणी स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी महानगर पालिका व नागपूर सुधार प्रन्यास कडे करूनही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांनी आज, ४ सप्टेंबर २०२४ रोजी शहर विकास मंचचे संयोजक अनिल वासनिक, उप्पलवाडी चे कार्यकर्ते कृष्णानंद यादव, भैयालाल यादव, सहजाद शेख, आनंद नाखले, शीतल कुमरे यांच्या नेतृत्त्वात रस्त्यावर पाणी साचलेल्या खड्ड्यांमध्ये उभे राहून मानवी श्रृंखला साकारली.

आणखी वाचा-विलोभनीय कडी असलेला शनी ग्रह ८ सप्‍टेंबरला पृथ्वीजवळ, दुर्बिणीने पाहता येणार विलोभनीय दृश्‍य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वेळी रामसुमेध दुबे, नन्हे पाल, अमरिश द्विवेदी, प्रकाश अंबुले, रिशाद अंसारी, संजय शेंडे, आशीश जांभुळकर, एस.आर.ए. संकुल विकास समितीचे अध्यक्ष गोपी बोदले, अमोल बोदले, सोनल ठाकरे, नूतन राऊत, उत्तर नागपूर विकास आघाडीचे संघठक ओमप्रकाश मोटघरे, शैलेंद्र वासनिक, धम्मपाल वंजारी उपस्थित होते. या लक्षवेधी उपक्रमात रवी शाहू, सोनू यादव, धर्मेंद्र द्विवेदी, किशोरसिंग ठाकूर, नन्दू यादव, विनोद तिवारी, ओम दुबे, मदन शेंडे, संजय यादव, जयप्रकाश यादव, भोला यादव, राजकुमार यादव यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिकांनी सहभाग नोंदविला. गडकरी यांनी लोकांच्या प्रश्नांवर दोन वेळा जनता दरबार घेतला. सर्वाधिक तक्रारी रस्ते, खडे, उड्डाणपुलाच्या कामामुळे होणारी गैरसोय याबाबत शेकडो तक्रारी आल्या होत्या.