नागपूर : वाघांच्या अधिवासावर माणसाने अतिक्रमण केले आणि आपला अधिवास शोधण्यासाठी वाघ बाहेर पडायला लागला. त्यातून मानव -वन्यजीव संघर्ष उभा राहिला. आधी वाघ गावात जात होते आणि आता वाघांना रिसॉर्ट आवडायला लागले आहे. पेंच व्याघ्रप्रकल्पातील वाघाने चक्क रिसॉर्टचा मार्ग धरला आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली.
अलीकडच्या काही वर्षात व्याघ्रप्रकल्पालगत रिसॉर्टचे पेव फुटले आहे. व्याघ्रपर्यटनाच्या भरवश्यावर वनविभागासह रिसॉर्टचालकांच्या तिजोरीत देखील भर पडत आहे. मात्र, त्याचवेळी काही धनाढ्य रिसॉर्टचालकांकडून नियम देखील मोडीत घातले जात आहेत. त्यामुळे या रिसॉर्टजवळ वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. त्याचाच फायदा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केला जात आहे. मात्र, आता वाघच रिसॉर्टजवळ फिरू लागल्याने पर्यटकांसाठी ते धोक्याचे ठरत आहे.
पेंच व्याघ्रप्रकल्पातील या घटनेने आता वनखात्यासमोरही पेच निर्माण झाला आहे. पेंच व्याघ्रप्रकल्पातील सिल्लारी बिटात वाघ असल्याची माहिती सालई येथील राजू उईके यांनी भ्रमणध्वनीवरून वनखात्याला दिली. घटनेची माहिती मिळताच पवनी वनपरिक्षेत्र अधिकारी, विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी सलाई गावाजवळील रेस्टफो नावाच्या रिसॉर्ट परिसरात एका वाघाचा वावर आढळून आला.
सदर रिसॉर्ट हे पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्राच्या सीमेपासून अंदाजे ७०० मीटर अंतरावर स्थित आहे. संयमित व प्रभावी पद्धतीने कारवाई करून वाघास कोणतीही हानी न करता सुरक्षितपणे जंगलात परतवण्यात आले. या घटनेत कोणतीही मानवहानी झाली नाही. वनविभागाकडून बफर क्षेत्रातील वाघांच्या हालचालीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
पर्यटनस्थळे व स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती करून सुरक्षा उपाययोजना राबवण्यात येत आहेत. वनविभागाने सर्व नागरिकांना जंगली प्राण्यांच्या संपर्कात आल्यास त्यांना त्रास न देता तत्काळ नजीकच्या वनकार्यालयाला माहिती द्यावी. उमरेड-पवनी-कऱ्हाडला अभयारण्यातील एका पंचतारांकित रिसॉर्ट परिसरात देखील सातत्याने व्याघ्र दर्शन होत आहे. त्यामुळे याठिकाणी देखील पर्यटनाचा अतिरेक झाला आहे.