गडचिरोली : जिल्ह्यातील कोरची तालुक्यात येत असलेल्या सोहले गावाजवळील टेकडीवर मंजूर लोहखाण परिसरात विनापरवानगी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे लवकरच खनिज उत्खननाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. काही महिन्यांपूर्वी खाणीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याला देखील गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. तरी सुद्धा आदिवासींच्या जमिनी दिशाभूल करून लाटण्यात आल्याचीही चर्चा आहे. एरवी रस्त्यांच्या कामात वन कायद्याची आडकाठी आणणारे वन आणि महसूल विभाग यावर मात्र मूग गिळून गप्प असल्याचे चित्र आहे.

दक्षिण गडचिरोलीत सूरजागाड टेकडीवरील लोहाखाण यशस्वी सुरु केल्यानंतर प्रशासन आणि कंत्रादार कंपनी आता उत्तर गडचिरोलीतील खाण देखील सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरची तालुक्यात येत असलेल्या सोहले गावानजीकच्या खाणीपर्यंत जाण्यासाठी कंत्राटदार कंपनीने रस्त्याचे बांधकाम केले. या खाणीतील ६५ हेक्टरचे क्षेत्र अंजता मिनरल्स या कंपनीला देण्यात आले आहे.

गावाकऱ्यांचा विरोध आणि नक्षलवाद्यांच्या भीतीपोटी गेल्या अनेक वर्षापासून या खाणीत उत्खनन करण्यासाठी कंत्राटदार कंपनी उत्सुक नव्हती. मात्र, उत्तर गडचिरोलीतील नक्षलवाद पूर्णपणे संपल्याचे पोलिसांनी जाहीर करताच या ठिकाणी उत्खननाच्या हालचाली सुरु झाल्या आहे. यासाठी काही आदिवासींची खाजगी जमिनी देखील त्यांनी करार करून आपल्या ताब्यात घेतल्या. मात्र, या करारात अनेक प्रश्न उपास्थित कारण्यात येत आहे. सोबतच खान परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परवानगीपेक्षा अधिक झाडे या ठिकाणी तोडण्यात येत आहे. तरीसुद्धा वनविभाग कारवाई करण्यास उत्सुक नाही. या संदर्भात या परिसरातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते कधीच उत्तर देत नाही. स्थानिक गावकऱ्यांचा आणि ग्रामसभेचा या खाणीला विरोध आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी  रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी गेलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत स्थानिकांचा मोठा वाद झाला होता. अवैध वृक्षतोड आणि मुरूम उत्खननाचे आरोप देखील झाले होते.

झेंडेपारमध्ये लवकरच उत्खनन

कोरची तालुक्यात सोहले आणि झेंडेपार या दोन खाणींचे कंत्राट पात्र कंपनीला देण्यात आले आहे. यातील झेंडेपार लोहखाणीसाठी मागील वर्षी जनसुनावणी घेण्यात आली होती. याला देखील ग्रामसभांचा मोठा विरोध झाला. त्यामुळे वर्ष उलटल्यानंतरही या ठिकाणी देखीलउत्खनन सुरू झालेले नाही.

झेंडेपार टेकडीवर ४६ हेक्टर परिसरात लोह खनिजाच्या उत्खननासाठी जवळपास १५ वर्षांपूर्वी अगरवाला आणि इतर चार भागीदार कंपनीना कंत्राट देण्यात आले होते. तेव्हापासून स्थानिक आदिवासी आणि ग्रामसभांचा या खाणीला विरोध आहे. त्यामुळे प्रशासनाला तीनदा जनसुनावणी स्थगित करावी लागली होती.  महिनाभरापूर्वी प्रशासनिक स्तरावर झेंडेपारचा प्रश्न मार्गी निघाला असून लवकरच येथे देखील उत्खनन सुरू होणार आहे

या संदर्भात अधिक माहिती घेण्यात येत आहे. संपूर्ण चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.रमेश कुमार, मुख्य वनसंरक्षक गडचिरोली</strong>