अमरावती :  वृद्ध पती-पत्‍नी जेवण करीत असताना पत्‍नीने ताटात खिचडी कमी वाढल्‍याच्‍या क्षुल्‍लक कारणावरून वाद पेटला आणि पतीने पत्‍नीला लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. यानंतर काठीनेही वार केल्‍याने पत्‍नीचा मृत्‍यू झाला. ही धक्‍कादायक घटना चिखलदरा तालुक्‍यातील डोमा येथे उघडकीस आली आहे. लुकाय भाकू सावलकर (६५) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पती भाकू हिरालाल सावलकर (७०) याला अटक केली आहे.

भाकू सावलकर हा शेतमजुरी करतो. शेतात काम करून तो संध्याकाळी घरी परतला. त्‍याने मद्य प्राशन केले होते. त्याने पत्नीला जेवण वाढण्‍यास सांगितले. दोघेही जेवण करण्‍यास बसले तेव्‍हा खिचडी कमी आहे, असे लुकाय हिने सांगितले. त्‍यामुळे भाकूचा राग अनावर झाला. मी रोज कामावर जातो आणि तू मला जेवणात खिचडी कमी का देते, अशी विचारणा त्‍याने केली. दोघांमध्‍ये चांगलाच वाद झाला.  भाकू याने पत्‍नीला आधी लाथा-बुक्‍क्‍यांनी आणि नंतर काठीने मारहाण केली यात पत्नीच्या डोक्यावर वार बसला, त्‍यामुळे ती गंभीर जखमी झाली. अत्‍याधिक रक्‍तस्‍त्रावामुळे लुकाय हिचा मृत्यू झाला.

हेही वाचा >>>ट्रॅफिक सिग्नलवर ‘ग्रीननेट’ची सावली, नागपूरकरांचा उन्हापासून…

भाकू सावलकर याचा नातेवाईक अल्‍केश भोगीलाल मावस्‍कर (२७) हा जेव्‍हा त्‍याच्‍या पत्‍नीसह शेतातून घरी परतला, तेव्‍हा लुकाय ही रक्‍तबंबाळ अवस्‍थेत आढळली. त्‍याने भाकू यांच्‍याकडे विचारणा केली असता, ताटामध्‍ये खिचडी कमी वाढल्‍याने वाद झाला आणि आपण लुकाय हिला मारहाण केल्‍याचे भाकू याने अल्‍केशला सांगितले.

हेही वाचा >>>उपराजधानीत मेंदूमृत अवयवदात्यांची संख्या दीडशेवर; चालू वर्षात उच्चांकाकडे वाटचाल

या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील यांना कळताच त्‍यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. आरोपी हा घरातच मृतदेहाजवळ बसून होता. अल्‍केशच्‍या फिर्यादीवरून पोलिसांनी हत्‍येचा गुन्‍हा दाखल करून भाकू याला अटक केली.  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लुकाय हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्‍यात आला. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक आनंद पिंदूरकर यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार संजय तायडे, विनोद इसळ, कृष्णा अस्वार, दीपक सोनाळेकर करीत आहेत.