यवतमाळ : मी कमिशनखाऊ नेत्यांपैकी नाही. त्यामुळे दिलेले काम वेळेत आणि दर्जेदारपणे करा, नाही तर परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहा, असा दम केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. माहूर (जि. नांदेड) येथे माहुरगड स्कायवॉक भूमिपूजन कार्यक्रमानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.
या वेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष न्या. नागेश न्हावकर, खा. हेमंत पाटील, आ. मदन येरावार, आ. राम पाटील रातोडीकर, आ.भीमराव केराम, आ. तुषार राठोड, आ. श्यामसुंदर शिंदे, आ. नामदेव ससाणे, माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, यवतमाळ जिल्हा भाजपा अध्यक्ष नितीन भुतडा, नांदेड जिल्हा भाजपाचे व्यंकट पाटील गोजेगावकर आदी उपस्थित होते.
गडकरी आज सहपरिवार माहूर येथे रेणुका देवीच्या दर्शनासाठी आले होते. त्यांच्या हस्ते नियोजित लिफ्ट व स्कायवॉकच्या कामाचे ई- भूमिपूजन झाले. यावेळी जाहीर सभेत बोलताना गडकरी म्हणाले, जनतेचा पैसा आहे, चांगले काम झाले पाहिजे. नाहीतर नेत्याला दक्षिणा दिली, आता जमून जाईल, असे वाटत असेल तर भ्रमात राहू नका. दक्षिणा घेणाऱ्यांपैकी आम्ही नाही, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात त्यांनी कोठारी ते सरसम व वारंगा रस्त्याचे काम करणाऱ्या सबंधित कंत्रारदारास काढून टाकण्याची घोषणा केली. माहूर गडावरील स्कायवॉकच्या ५१ कोटींच्या कामाला १८ महिने कसे लागतात? काम वर्षभरात पूर्ण करा. लवकर काम पूर्ण केल्यास आपण पुन्हा रेणुका मातेच्या दर्शनाला येऊन तुमचा सत्कार करू, असे यावेळी गडकरी म्हणाले.
हेही वाचा – चंद्रपूरवासीयांची सावलीने साथ सोडली; सूर्य डोक्यावर मात्र सावली गायब…
‘त्या’ अपघाताची आठवण!
२०१४ मध्ये आपला अपघात झाला होता. त्यातून बरे झाल्यानंतर माहूर गडावर परिवारासह दर्शनासाठी आलो होतो. तेव्हा खुर्चीवरून गडावर जावे लागले होते. त्यावेळी आपल्या कुटुंबीयांनी काहीही कर पण, गडावर सहज जाण्याची व्यवस्था कर, असे सांगितले होते. आज ‘रोप-वे’च्या प्रकल्पाचे उद्घाटन करताना आनंद होत आहे. पूर्वी नागपूरवरून माहूरला यायला सात ते आठ तास लागायचे. आज केवळ अडीच तासांत रस्त्याने नागपूरहून माहूरला आल्याचे त्यांनी सांगितले.