अकोला : लाडकी बहीण योजनेला मविआने तीव्र विरोध केला. आम्ही जे बोललो, ते करून दाखवले. या योजनेचे पाच हप्ते दिले. ‘मविआ’ सरकारप्रमाणे हफ्ते घेणारे नव्हे, तर महायुतीचे हफ्ते देणारे सरकार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लक्ष्य केले.

बाळापूर मतदारसंघातील वाडेगाव येथे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार अनुप धोत्रे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी महायुती सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती देत विरोधकांवर निशाणा साधला.

हेही वाचा : दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..

ते म्हणाले, महायुतीचा विकासाचा अजेंडा आहे. एकदा दिलेला शब्द मागे घेत नाही. दोन वर्षांपूर्वी राज्यात उठाव करून सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आणून दाखवले. जनतेने युतीला निवडून दिले, मात्र त्यांनी मतदारांशी बेईमानी केली. सत्ता सोडण्याची हिम्मत आम्ही दाखवली. बाळासाहेबांचे विचार मोडले-तोडले जात होते. ‘उबाठा’ने काँग्रेसकडे गहाण टाकलेला पक्ष सोडवला. आता हा पक्ष नेत्यांचा नाही तर कार्यकर्त्यांचा आहे.

राज्यात महायुती सरकारने गेल्या दोन वर्षांत भरीव काम केले. मविआने सर्व विकास कामांमध्ये खोडा घातला होते. सगळी कामे बंद केली होती. महायुतीचे सरकार येताच, विकासाची गाडी वेगाने धावायला लागली. १२४ सिंचन प्रकल्पाला मंजुरी दिली. मविआ सरकारच्या काळात केवळ चार प्रकल्पांना मंजुरी मिळाली होती.

हेही वाचा : एकदाच मतदान करण्याचा अधिकार…पण, या गावात मात्र दोन वर्षांत चौथ्यांदा…

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मविआच्या मुख्यमंत्र्यांनी केवळ तीन कोटी दिले. आम्ही ३५० कोटी रुपये देऊन एक लाख लोकांचे जीव वाचवले. संपूर्ण देशाचा विचार केल्यास एकट्या महाराष्ट्रात ५२ टक्के विदेशी गुंतवणूक आणली. मतदानानंतर लगेच लाडक्या बहिणीचे डिसेंबरचे पैसे सुद्धा टाकणार आहोत. बहिणींना लखपती झाल्याचे बघायचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मविआ सरकार आले तर सर्व योजनांची चौकशी लावण्याची धमकी विरोधक देतात. मात्र, पोकळ धमक्यांना आम्ही भीत नाही. वेळेप्रसंगी आम्ही कारागृहात जाण्याची देखील तयारी ठेवतो. विरोधक दुतोंडी आहेत, अशी टीका त्यांनी केली.

…इतर राज्याप्रमाणे ते महाराष्ट्रात देखील फसवतील

लाडक्या बहीण योजनेला विरोध केल्यावर न्यायालयाने त्यांना फटकारले. लाडक्या बहिणींचा घास हिरवण्याचे पाप विरोधक कुठे फेडतील. आता निवडणुकीत ते तीन हजार देण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र, इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात देखील ते फसवतील. त्यापासून सावध राहिले पाहिजे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.