अकोला : सप्त खंजेरीवादक, प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे फेसबुक पेज हॅक झाले. या प्रकरणी अकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. हे पेज बंद करावे तसेच घडलेल्या प्रकारची शहानिशा करावी, अशी तक्रार सत्यपाल महाराज यांचे चिरंजीव डॉ. धर्मपाल चिंचोळकर यांनी पोलिसांकडे दिली. सप्त खंजेरीवादक, समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज चिंचोळकर यांच्या सामाजिक प्रबोधन कार्यक्रमांचा व इतर सामाजिक उपक्रमांचा व्यापक प्रचार- प्रसार व्हावा, या अनुषंगाने फेसबुक पेज तयार केले आहे. हे पेज सत्यपाल महाराज या व्यक्तिगत फेसबुक अकाउंटला लिंक आहे.

हेही वाचा : “शैक्षणिकदृष्ट्या परिपूर्ण व्यक्ती सुसंस्कृतही असणे आवश्यक,” केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या फेसबुक पेजवरून एक अश्लील पोस्ट केलेली दिसून आली. ती पोस्ट बघून सर्व अचंबित झाले. पोस्ट तत्काळ हटवण्यासाठी प्रयत्न केला, तर वैयक्तिक अकाउंटला वापरण्याचे अधिकार बंद झाल्याचे दिसून आले. फेसबुक पेज हॅक झाल्याचे आढळून आले. कोणत्याही प्रकारची चुकीची किंवा अश्लील पोस्ट शेअर झाल्यास त्यासाठी आम्ही जबाबदार असणार नाही, फेसबुक पेज आपल्या स्तरावरून बंद करण्यात यावे व घडलेल्या प्रकारची शहानिशा करावी, असे तक्रारीत नमूद आहे. अकोट शहर पोलिसांनी पुढील कारवाईसाठी ही तक्रार अकोला येथे सायबर विभागाकडे पाठविली. “फेसबुक पेज हॅक झाल्याचे लक्षात आले. याची पोलीस तक्रार करण्यात आली आहे”, असे सत्यपाल महाराज यांनी सांगितले आहे.