अकोला : शहरातील तारफैल भागात विजय नगर येथील बजरंग चौकामध्ये दाट वस्तीत एका घरातून गॅस गळती सुरू झाली होती. काही वेळातच गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. या आगीची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली.

परिसरातील नागरिकांनी आगीवर नियंत्रणाचा प्रयत्न केला. मात्र, आग नियंत्रणात येऊ शकले नाही. अग्निशमन विभागाने आगीवर पाण्याचा मारा करून ती नियंत्रणात आणली. आग नियंत्रणात आणतांना महानगरपालिकेचा एक कर्मचारी जखमी झाला आहे. या आगीची झळ परिसरातील पाच घरांना बसली. आग लागल्याच्या घटनेमध्ये संजय ढवळे, रवी गायकवाड, निंबाब निंबे, अक्षय अरुणकर, राजेश घामोडे यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

घरातील साहित्य जळून खाक झाले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सिलिंडर स्फोट होऊन घडलेल्या आगीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच अकोला पश्चिमचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय अग्रवाल यांनी घटनास्थळाला भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

हेही वाचा : ‘समृद्धी’वर अपघातांसह गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ, दरोड्यासाठी वेगवान ‘एसयुव्ही’…

शहरातील तारफैल भागातील विजय नगर येथील बजरंग चौकामध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेमध्ये पाच घरांचे मोठे नुकसान झाले. महापालिकेचा एक कर्मचारी जखमी झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गॅस कंपनीने मदत द्यावी

खासदार अनुप धोत्रे यांनी दिल्ली येथून, तर मुंबईवरून आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल यांनी विजयनगरच्या बजरंग चौकातील गॅस स्फोट प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन शासनाने त्वरित मदत देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याची सूचना केली. दरम्यान, गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीमध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गॅस गळती व सिलिंडर स्फोट प्रकरणाची सविस्तर चौकशी करून गॅस कंपनीने नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय अग्रवाल यांनी केली. भाजपाच्यावतीने दहा हजार रुपये प्रत्येकी देण्याचे आश्वासन विजय अग्रवाल यांनी नुकसानग्रस्तांना दिले. विजय अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधून मदत देण्याची त्वरित कारवाई करण्याचे सांगितले. यावेळी माजी उपमहापौर सुनील मेश्राम, पवन महल्ले, कमल खरारे, उज्वल बामणे, उमेश लखन, प्रकाश घोगलिया, राजेंद्र गिरकैलास रणपिसे आदी उपस्थित होते.