अकोला : खरीप व रब्बी हंगामातील बळीराजाच्याा हिरव्या स्वप्नावर अवकाळी पावसाने पाणी फेरले. खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेले कापूस व तूर पिके उद्ध्वस्त झाली. फळ, भाजीपाल्यासह रब्बी हंगामातील पिकांना देखील मोठा फटका बसला. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागात पंचनामे केली जात असून सात तालुक्यात ६३ हजार ८६१ हेक्टरवरील शेती पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. संयुक्त पंचनामे तयार केले जात असून त्यानंतर अंतिम प्रस्ताव शासनाला मदतीसाठी पाठवला जाईल.
निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना नेहमीच फटका बसतो. या दुष्टचक्रातून यंदा देखील बळीराजा सुटला नाही. यावर्षी मौसमी पाऊस देखील उशिराने दाखल झाल्याने खरीप हंगामात पेरण्याला दिरंगाई झाली होती. दरम्यान, दीड महिना पावसाने खंड दिल्याने उत्पादनात घट झाली. त्यामुळे शेतकरी रब्बी हंगामावर विसंबून होते. रब्बी हंगामाची पेरणी झाल्यावर पिके बहरात येत असताना २६ नोव्हेंबरच्या रात्रीपासून जिल्ह्यात सलग पाच दिवस अवकाळी पाऊस बरसला. या अवकाळीमुळे खरीप हंगामातील तूर, कापसासह रब्बी हंगामातील हरभऱ्याचे मोठे नुकसान झाले. अवकाळीच्या फटक्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. वातावरणातील अस्थिरतेचा तुरीच्या पिकावर दुष्परिणाम होताना दिसत आहे.
हेही वाचा… चंद्रपूर : वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू
हेही वाचा… शिवमहापुराण कथेच्या आयोजनामुळे पर्यावरणाला धोका! मानव-वन्यजीव संघर्ष…
जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर कालावधीत सातही तालुक्यात ६३ हजार ८६१ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात खरीप हंगामासह रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील तब्बल ८३२ गावांतील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. त्या अकोला तालुक्यातील ३५ गावे, बार्शीटाकळी तालुक्यातील १६० गावे, मूर्तिजापूर तालुक्यातील १६६ गावे, अकोट तालुक्यातील १८६ गावे, तेल्हारा तालुक्यातील ७८ गावे, बाळापूर तालुक्यातील ११३ गावे, पातूर तालुक्यातील ९४ गावांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी, अकोला, अकोट, मूर्तिजापूर व बाळापूर तालुक्यांमध्ये नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.