अमरावती : तिवसा तालुक्यातील सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका १३ फूट लांबीच्या अजगराने २० किलो वजनाची बकरी गिळण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्यात यशस्वी झाला नाही. या अजगराचा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला आहे.
सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका अजगराने बकरी गिळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सर्पमित्राला मिळताच ते घटनास्थळी पोहचले. त्यांच्या अथक प्रयत्नाने अजगराचे प्राण वाचले. मात्र बकरीला यात जीव गमवावा लागला. ही घटना समाज माध्यमावर चर्चेचा विषय ठरली आहे. हा अजगर एका मोठ्या बकरीला शिकार करतो आणि संथपणे तिला गिळायला सुरूवात करतो. काही वेळातच बकरीचा काही भाग त्याच्या पोटात जातो, पण तिथेच त्याच्या अडचणी सुरू होता. बकरीचे वजन आणि आकार एवढा मोठा असतो, की अजगराला ती गिळणे अशक्य होते. काही क्षणातच त्याला घुसमटायला लागते.
भूषण भोंबे यांच्या बकऱ्या नेहमीप्रमाणे आजही चरण्यासाठी गेल्या होत्या. त्याच भागात भला मोठा अजगर दडून बसला होता. अजगराने बकरीवर झडप घालून तिला गिळण्यासाठी विळखा घातला. विळखा मारल्याने अजगराला कमालीचा त्रास होत होता. ही बाब काही लोकांच्या निदर्शनास येताच त्यांनी ही माहिती सर्पमित्र अविनाश पांडे यांना दिली. पांडे यांनी अजगराच्या तावडीतून त्या बकरीला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु, बकरीचा जीव वाचला नाही. मात्र, अजगराचे प्राण वाचवण्यात ते यशस्वी झाले.
सर्पमित्र अविनाश पांडे यांनी अजगराला सुरक्षितपणे पकडल्यानंतर वन विभागात नोंद करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. या घटनेची नोंद घेण्यात आली असून मृत बकरीचा देखील पंचनामा करण्यात आला. सर्पमित्राने अजगराला सुखरूप पकडून आणले. याची नोंद घेतल्यानंतर अजगराला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती वन विभागाद्वारे देण्यात आली.
सध्या नाग, घोणस, अजगर हे नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडून भक्ष्याच्या शोधात नागरी वस्त्यांकडे जात आहेत. वन्यजीव कायद्याअंतर्गत अजगर हा शेड्यूल एकमध्ये संरक्षित आहे. अजगर हा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे. सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. अधिवास नष्ट होणे आणि अपुऱ्या संवर्धनामुळे भारतीय अजगरांची संख्या सुमारे ३० टक्के घटल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.