अमरावती : एका ५४ वर्षीय विवाहित महिलेवर जादूटोणा केल्याचा आरोप करून गावात बदनामी केल्याची घटना वरूड तालुक्यात घडली. ‘तू कर्नाकटी आहेस’, असे म्हणत महिलेला मानसिक त्रास देण्यात आला आणि तिची प्रतिष्ठा उध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी वरूड पोलिसांनी तीन जणांविरुद्ध जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना वरूड तालुक्यातील एका गावात घडली. पीडित महिला नेहमीप्रमाणे मंदिरात आरतीसाठी गेली असताना, आकाश पुंडलिक राऊत, पुंडलिक राऊत आणि कैलास पुंडलिक राऊत (सर्वजण रा. वरूड) या तिघांनी गावकऱ्यांसमोर ती जादूटोणा करते, अशी बदनामी केली. तिन्ही आरोपींनी “तू सकाळीच करणी करायला गेली होतीस, तूच आमच्या घरच्यांवर जादूटोणा करतेस,” असे म्हणत महिलेला लक्ष्य केले. इतकेच नव्हे तर आरोपींनी तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप महिलेने केला आहे.

या संपूर्ण घटनेने पीडित महिला मानसिकदृष्ट्या खचली असून, शेवटी तिने वरूड पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ अंतर्गत कलम ३(२) सह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास वरूड पोलीस ठाण्याचे ठाणेदार अर्जुन ठोसरे करीत आहेत.

पाचवा जादूटोणा विरोधी गुन्हा

वरूड पोलिसांनी दाखल केलेला हा गुन्हा यंदाच्या वर्षातील जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये नोंदविण्यात आलेला पाचवा गुन्हा ठरला आहे. याआधी चिखलदरा पोलिसांनी १८ जानेवारी, २७ जानेवारी आणि २६ फेब्रुवारी रोजी अनुक्रमे तीन गुन्हे दाखल केले होते. तसेच गाडगेनगर पोलिसांनी बलात्कार प्रकरणात एका मांत्रिकावरही याच कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.

मेळघाटातील चिखलदरा व धारणी परिसरात अशा प्रकारच्या घटना वारंवार उघडकीस येत असून, आजही ग्रामीण भागात अंधश्रद्धा आणि अघोरी प्रथा कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. आजारीपणासारख्या नैसर्गिक कारणांमागेही जादूटोणाच कारणीभूत ठरवत निष्पाप महिलांवर शारीरिक व मानसिक अत्याचार होतात, ही बाब सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर मानली जात आहे.

सामाजिक जागृतीची गरज

या प्रकरणाने पुन्हा एकदा अंधश्रद्धांविरोधातील लढ्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. अशा घटनांना आळा बसवण्यासाठी समाजातील सर्व स्तरांनी पुढे येऊन अंधश्रद्धा निर्मूलन आणि कायदा अंमलबजावणी यावर भर देणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.