अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा या उपक्रमांच्या प्रयोगशाळा बनल्या आहेत. शिक्षकांना शिकवण्याचे काम सोडून विविध ऑनलाईन कामे व अनावश्यक उपक्रम राबवल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे जायला वेळच मिळत नाही. त्यामुळे आम्हाला शिकवू द्या, अशी मागणी करीत शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. या मोर्चात जिल्ह्यातील शिक्षक उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. सततच्या अशैक्षणिक कामांच्या व्‍यापामुळे शिक्षकांना शिकविण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपासून शिक्षकांना दूर सारण्याचे धोरण सरकारने आखले आहे की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करणे, शालेय पोषण आहाराच्या बदललेल्या पाककृतींमुळे शिक्षकांच्या अशैक्षणिक कामात भरच पडली असून ही योजना स्वतंत्र यंत्रणेकडे हस्तांतरित करणे, १०-२०-३० वर्ष सेवेनंतरची आश्वासित प्रगती योजना प्राथमिक शिक्षकांना लागू कराणे, मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करणे, अशैक्षणिक कामे कमी करणे इत्यादी प्रमुख मागण्यांसह शिक्षकांच्या इतर अनेक मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांतील शिक्षकांनी सामूहिक रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.

हेही वाचा : बावनकुळेंच्या संस्थेला भूखंड, मविआ नेत्यांकडून भाजप लक्ष्य

मोर्चात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, अमरावती जिल्हा प्राथमिक शिक्षक भारती, कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा अमरावती, प्रहार शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना, अखिल महाराष्ट्र उर्दु शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महामंडळ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (संभाजी थोरात प्रणित), महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ, महाराष्ट्र राज्य एकल शिक्षक सेवामंच, पदवीधर प्राथमिक शिक्षक व फ्रेंद्रप्रमुख संघटना, वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना, चेतवा कर्मचारी संघटना सहभागी झाल्‍या होत्‍या.

हेही वाचा : भाकप नेते डी. राजा म्हणतात, नितीन गडकरी चांगले व्यक्ती…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेल्या सभेला खासदार बळवंत वानखडे, अखिल भारतीय शिक्षक संघाचे प्रभाकर झोड, शिक्षक समितीचे राजेश सावरकर, शिक्षक परिषदेचे नेते सुनील केणे, महापालिका शिक्षक संघटनेचे प्रहार शिक्षक संघटनेचे महेश ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.