भंडारा : परीक्षेत नापास झाल्यानंतर किंवा नापास होण्याच्या भीतीपोटी विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलत असल्याच्या अनेक दुर्दैवी घटना समोर येत असतात. भंडाऱ्यातही अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका तरुणाने नीट परीक्षेत नापास होणार या भीतीने स्वतःचे आयुष्य संपविले. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वी नीटची परीक्षा पार पडली. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भंडाऱ्यातील २१ वर्षीय तरुणाने सुद्धा ही परीक्षा दिली. मात्र आपण नीटच्या परीक्षेत नापास तर होणार नाही ही भीती त्याला सतावत होती. अखेर निकाल लागण्यापूर्वीच निकालाच्या भीतीने या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
शिक्षणातील मानसिक तणावाने आणखी एक तरुण बळी घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना तुमसर तालुक्यातील हसाराटोली गावात घडली आहे. अमित रमेश बिसने असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. अमित मागील अनेक महिन्यांपासून वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परिक्षेची तयारी करत होता. या वर्षीचा निकाल शनिवारी लागणार असल्याने तो प्रचंड तणावात होता. भीतीच्या भरात तरूणाने टोकाचं पाऊल उचललं. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
नीटची परीक्षा देण्याची ही अमितची दुसरी वेळ होती. पहिल्या प्रयत्नात त्याला मिळालेल्या गुणांनी तो समाधानी नव्हता त्यामुळे त्याने पुन्हा एका परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याने परीक्षेसाठी चांगली तयारी केली होती. मात्र पेपर सोडवून आल्यानंतर त्याला अपेक्षित गुण मिळतील किंवा नाही अशी भीती वाटू लागली. या वर्षीचा नीट परीक्षेचा निकाल शनिवारी, १४ जून रोजी लागणार असल्याने अमित प्रचंड तणावात होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.
वडील रमेश बिसने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी अमितला नीटमध्ये ५९६ गुण मिळाले होते. यंदा अपेक्षित यश मिळणार नाही, या भीतीने तो मानसिकदृष्ट्या खचला होता. या भीतीच्या भरात त्याने गळफास लावून आपले आयुष्य संपवले असावे, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. घटनेच्यावेळी अमित घरी एकटाच होता. त्याने घरातील सिलिंग फॅनला दोरी लावून आत्महत्या केली. काही वेळाने कुटुंबीय घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.
या प्रकरणी तुमसर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १९४ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.