भंडारा : चॉकलेटचे आमिष दाखवून घराशेजारी राहणाऱ्या दोन चिमुकलींवर एकाने लैंगिक अत्याचार केला. ही घटना भंडारा जिल्ह्यातील करडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. भंडाऱ्यात नुकत्याच घडलेल्या या एका घटनेने संताप व्यक्त होत आहे.

राज्यात सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. कुठे भरदिवसा किरकोळ कारणावरून हत्या तर कुठे अत्याचार, लैंगिक शोषणाच्या घटनांनी महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे का नाही? असा सवाल वारंवार उपस्थित होत असताना भंडारा जिल्हा हादरला आहे. चॉकलेटचे आमिष देऊन दोन ८ व ९ वर्षांच्या मुलींवर घराशेजारी राहणाऱ्या ३६ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

भंडारा जिल्ह्यातील करडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेनंतर करडी पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.अतुल बुराडे असे या नराधमाचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून शेजारी राहणाऱ्या तरुणाने चॉकलेटचे आमिष दाखवत अनेक दिवस हा संतापजनक प्रकार सुरु असल्याचं समोर आलं आहे.

आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. करडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंढरी या गावातील ही घटना असून आरोपी अतुल बुराडे याच्या घराशेजारी राहणाऱ्या ८ आणि ९ वर्षीय चिमुकलींसोबत मागील काही दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दुसरीकडे सावत्र बापाने केला अत्याचार…

सावत्र बापानेच १५ वर्षीय मुलीवर झोपेतच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी आरोपी बापाविरुद्ध कलम ६४ (२)(एफ), ६५ (१) भारतीय न्याय संहिता सह कलम ४, ६ पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केली असून नराधम बापाला अटक केली. घरात झोपलेल्या १५ वर्षीय मुलीवर सावत्र बापानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका गावात घडली. विशेष म्हणजे गेल्या एप्रिल महिन्यात ही घटना घडली असून आज समोर आल्याने गावातही खळबळ उडाली आहे याप्रकणी, आरोपी बापाविरुद्ध मुलीने फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.