भंडारा : कोणताही वैध परवाना नसताना एका कंपनीने खोटी बिले तयार करून शेतकऱ्यांना घरोघरी जाऊन खत विक्री केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तुमसर तालुक्यातील मांढळ येथे गोदावरी फर्टिलायझर कंपनीकडून विनापरवाना सेंद्रिय खत विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाने संयुक्त कारवाई करत संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.

बुधवारी (१६ जुलै) कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) हेमराज धांडे यांना माहिती मिळाली की, गोदावरी फर्टिलायझर कंपनीचे प्रतिनिधी “गोदावरी गोल्ड” हे खत शेतकऱ्यांना थेट घरोघरी जाऊन विकत आहेत. यावर त्वरित कारवाई करत त्यांनी जिल्हा भरारी पथकातील अभिजीत पटवारी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर भरारी पथक प्रमुख विकास सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तपासणी केली असता, एम एच २८ बीए २२९९ क्रमांकाच्या ट्रकमधून संबंधित खतांची विक्री होत असल्याचे आढळले. गावातील शेतकऱ्यांनी खताच्या एका बॅगसाठी ९०० रुपये मोजल्याची माहिती दिली. मात्र विक्री दरम्यान कोणताही वैध परवाना नसल्याचे व खोटी बिले देण्यात आल्याचे उघड झाले.

या प्रकारामुळे खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये गोदावरी फर्टिलायझर कंपनी, त्याचे प्रतिनिधी आणि उमंग कृषी सेवा केंद्र, तिरोडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान एकूण ४७ बॅग्स खत जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत ६८ हजार १५० इतकी आहे. पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फौजदारी गुन्हा दाखल करणार

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करावे व त्याचे पक्के बिल विक्रेत्यांकडून घ्यावे. जिल्हयात कोणीही अनाधिकृत अथवा विना परवाना असलेले बियाणे, खते व किटकनाशके विक्री करु नये अन्यथा संबंधीतावर विरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक संगीता माने यांनी केले आहे.