बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मातृतिर्थ सिंदखेडराजा तालुक्याला सोमवारी (१५ सप्टेंबर) जोरदार पावसाने झोडपले. यामुळे शेकडो एकरावरील खरीप पिकांची प्रचंड नासाडी झाली असून पाताळगंगा नदीला पूर आला आहे.
पाताळगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या पात्राचे पाणी नदी लगताच्या शेकडो हेक्टर शेतीमध्ये शिरले आहे. यामुळे शेतांना छोट्या तलावांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ऐन बहरात असलेली सोयाबीन, कपाशी आणि अन्य खरीप पिके, भाजीपाला, फळबागा पाण्यात बुडाल्या असल्याचे वृत्त आहे. यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घस हिरावला गेला आहे.
पावसामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील ऐतिहासिक किनगाव राजा नगरीला पुराचा धोका निर्माण झाला आहे. या कोसळधारांमुळे पातळगंगा नदीला पूर आला असून उंब्रज–देशमुख दोन गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेला. यामुळे वाहतूक ठप्प झाली असून पावसाचा तडाखा असाच कायम राहिला तर अनेक गावांचा संपर्क तुटण्याची साधार भीती आहे
सिंदखेड राजा तालुक्यात पाहावे तिकडे पाणीच पाणी आहे. सोयाबीन आणि कपाशीचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. सिंदखेडराजा तालुक्यात पळसखेड चक्का या भागातही मोठे नुकसान झाले असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यापूर्वी देखील सिंदखेड राजा तालुक्याला अतिवृष्टीचा प्रचंड फटका बसला. मुसळधार पावसाने हजारो हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. या नुकसानीची तत्काळ पाहणी, सर्वे करून भरपाई देण्याची मागणी होत आहे.