बुलढाणा : मुंबई येथून ६ वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिला पश्चिम बंगालकडे नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला शेगाव येथे जेरबंद करण्यात आले. रेल्वे पोलीस दल, लोहमार्ग पोलीस व शेगाव शहर पोलिसांनी शेगाव रेल्वे स्थानकात संयुक्त कारवाई करीत आरोपीला अपहृत बालिकेसह शालिमार एक्स्प्रेसमधून ताब्यात घेतले. यासाठी शालिमार एक्स्प्रेस थांबण्याची वेळ वाढवून घेण्यात आली होती. राठीन शंकर घोष (३३, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

नागपाडा, मुंबई येथून एका सहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून आरोपी युवक शालिमार एक्स्प्रेसने कोलकाताकडे निघाला होता. मुंबई पोलिसांनी शेगाव रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली. आज, बुधवारी शेगाव रेल्वे स्थानकावर आरपीएफ, लोहमार्ग पोलीस आणि शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. शालिमार शेगावात जास्त वेळ थांबवून गाडीची तपासणी करण्यात आली.

हेही वाचा : स्वच्छ हवेसाठी देशभरातून ८०० हून अधिक नागरिक एकवटले, उद्या आभासी मानवी साखळी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानक आले की शौचालयात लपायचा

अपहरणकर्ता अपहृत बालिकेसह जनरल कोचमधून प्रवास करीत होता. शेगावमध्ये गाडी थांबल्यानंतर पोलिसांनी पाहू नये यासाठी आरोपी शौचालयात जाऊन बसला. रेल्वे पोलिस विभागाचे रंजन तेलंग आणि विनोद इंगळे यांनी त्याला हुडकून काढल्यावर पोलिसी खाक्या दाखविल्या. यावर त्याने आपल्या सोबतची चिमुकली जनरल कोचमध्ये वरच्या बाजूला बसून असल्याचे सांगितले. तिच्या सुटकेची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणवीर सिंग, डॉ.विजय साळवे, रंजन तेलंग, विनोद इंगळे, प्रवीण भरणे, गजानन वैताकर, शहर पोलिसचे सिद्धार्थ यशोद यांनी ही संयुक्त कारवाई केली.