बुलढाणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वादग्रस्त विधान आणि परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ सिंदखेडराजा येथे आज आंबेडकरी समाज एकवटला. आज शुक्रवारी, २० डिसेंबर रोजी दुपारी सिंदखेडराजा बस स्थानक परिसरात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी अमित शहांचा पुतळा जाळला. यावेळी केंद्र व राज्य शासनाचा निषेध करणाऱ्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेर असलेल्या सिंदखेडराजा नगरीसह तालुक्यातील विविध आंबेडकरी संघटना, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी केंद्र शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोड्याने मारून पुतळ्याचे दहन करण्यात आले.

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये बोलताना आपल्या भाषणात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव एकेरी भाषेत घेऊन अवमान केल्याचा आरोप या आंदोलकांनी केला. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध ‘ॲट्रोसिटी ॲक्ट’ नुसार गुन्हा दाखल करावा. परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची मदत देवून कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्यात यावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा : संजय राऊत यांच्या घराची रेकी, आदित्य ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी आज सिंदखेड राजा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सर्व आंबेडकरी समाजातील विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते, भारतीय बौध्द महासभा, तसेच सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र जमले. बसस्टँड चौकात अमित शहा यांचा पुतळ्याचे दहन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व देशातील प्रत्येक नागरिकांचे रक्षक होते. त्यांचा अवमान म्हणजे सर्व देशाचा अवमान आहे. अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब व सर्व भारतीयांची माफी मागावी, त्यांच्याविरुद्ध देशद्राहाचा खटला दाखल करण्यात यावा. तसेच परभणी येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये अमानुष बेदम मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याला जबाबदार पोलीस अधिकारी व कर्मचारी आहेत असे वैद्यकीय अहवालात सिध्द झाले आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार सिंदखेड राजा यांना देण्यात आले. यापूर्वी चिखली येथील डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात गुरुवारी संध्याकाळी जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी भूमी मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध करून नंतर त्यांची सुटका केली.