बुलढाणा : राजकीय दृष्ट्या संवेदनशील आणि राजकीय, सामाजिक आंदोलने, चळवळीचे विदर्भातील प्रमुख केंद्र असलेल्या बुलढाणा शहरात वर्षभर विविध आंदोलने सुरु असतात. वेगळेपणामुळे काही आंदोलने गाजतात, अगदी सामान्य जनतेच्याही अनेक महिने आठवणीत राहतात. आज सोमवारी, ११ ऑगस्ट रोजी स्थानिय जिजामाता क्रीडा व व्यापार संकुल परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे करण्यात आलेले जन आक्रोश आंदोलन या पठडीतील ठरले. हे अभिनव आंदोलन अगदी सामान्य जनतेसाठी देखील लक्षवेधी ठरले.
यावेळी महायुती सरकारमधील वादग्रस्त आणि ठाकरे सेनेच्या भाषेत सांगायचे झाल्यास वादग्रस्त मंत्री आणि आमदार यांचा निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्या राजीनाम्याची किंवा हकालपट्टी ची मागणी या आंदोलनातून करण्यात आली. वर नमूद केल्या प्रमाणे यावेळी रमीबाज मंत्री, लेडीज बार वाले मंत्री, अघोरी पूजेचे आयोजन करणारे आणि कँटीन कर्मचाऱ्यास अमानुष मारहाण करणारे लोकप्रतिनिधी यांच्या ‘कामगिरी’वर आधारित जिवंत देखावे यावेळी साकारण्यात आले.
सत्तेत आल्यापासून राज्यातील महायुती सरकार वेळोवेळी वादात सापडले. काही मंत्री, काही आमदार यांच्या कारनाम्याने गाजले, वादग्रस्त ठरले. मात्र सरकार, सत्ता वाचविण्यासाठी त्यांच्यावर ठोस कारवाई करण्यात आली नाही. यामुळे जनतेत हे बेजबाबदार लोकप्रतिनिधी बद्धल प्रचंड चीड, आक्रोश आहे. जनतेतील हा आक्रोश, संताप व्यक्त करण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आले.
जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके, जिल्हा प्रमुख गजानन वाघ, जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांच्या पुढाकाराने आयोजित या आंदोलनातील देखावे पाहण्यासाठी सर्वसामान्य बुलढाणावासी देखील मोठ्या संख्येने आंदोलन स्थळी जमा झाल्याचे दिसून आले. तब्बल तीन तास हे जिवंत आक्रोश आंदोलन करण्यात आले.
कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे
बेताल वक्तव्य करणाऱ्या आणि भ्रष्टाचारी कलंकित मंत्र्यांचा राजीनामाच्या मागणीसाठी शिवसेनाच्या वतीने आज “जनआक्रोश आंदोलनाचा वार” करण्यात आला. धरणे , निदर्शनातून भ्रष्टाचारी आणि कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे …झालीच पाहिजे.. ही मागणी रेटून धरण्यात आली. रमी खेळणारे कृषीमंत्री, गृहराज्यमंत्र्यांच्या कुटुंबाचा डान्सबार, पैशाचा बॅगा शेजारी ठेऊन बसलेला मंत्री, अघोरी पूजा करणारा मंत्री, सामान्यांना ठोसा मारणारा लोकप्रतिनिधी अशा एकाहून एक सरस जिवंत देखावे या आंदोलनात सादर करण्यात आले. हे देखावे लक्षवेधक ठरले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी महायुती सरकारच्या विरोधात आपल्या भाषणातून आक्रमक हल्ला चढवला.
आंदोलनाची सुरुवात “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या महाराष्ट्र गीताने झाली. कलापथकांनी सादर केलेल्या “दोन दिवसाची दुनिया पाहू द्या… आमच्या कष्टाचा आम्हाला खाऊ द्या” अशा प्रकारच्या गीतांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली. यावेळी आ. सिद्धार्थ खरात जयश्री शेळके, जालिंदर बुधवत, महिला आघाडी प्रमुख चंदा बढे, सहसंपर्क प्रमुख वसंतराव भोजने, नंदू कऱ्हाडे, गजानन वाघ, संदीप शेळके यांची आक्रमक भाषणे झाली.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह सामान्यांचे प्रश्न जैसे थे असताना मंत्र्यांनी बेताल वक्तव्यसहित भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. यांना पाठीशी घालण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. केवळ सत्ता टिकवण्यासाठीच मुख्यमंत्री फडणवीस हे हतबल झालल्याचे यातून दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या विरुद्धचा लढा सुरूच राहील असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी बुलढाणा यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी महिला जिल्हाप्रमुख विजया खडसन, युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, विधानसभा संघटक सुनील घाटे, उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, आशिष रहाटे, बद्रि बोडखे, विलास सुरडकर, गजानन ठोसर, तुकाराम काळपांडे, विजय इतवारे, विजय इंगळे, किसन धोंडगे, राजू बुधवत, निंबाजी पांडव, श्रीराम खेलदार, दीपक चांभारे, गजानन बिलोकर, सुधाकर आघाव, प्रकाश डोंगरे, संजय शिंदे,शेख रफिक, अनिकेत गवइ, भीमराव पाटील, शुभम घोंगटे,प्रतिक्षा पिंपळे, दिपाली पाटील, गजानन धांडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.