चंद्रपूर : लोकसभेच्या चंद्रपूर – वणी – आर्णी मतदार संघात सकाळी ११ वाजतापर्यंत १८.९४ टक्के मतदान झाले. गणेश बाळकृष्ण पाटील या नवरदेवाने बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा हक्क बजावला.जिल्ह्यात २११८ मतदान केंद्रावर सकाळी सात वाजतापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होती. उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली आणि मतदान संथ होत गेले. जिल्ह्यातील धानोरा पीपरी येथील नवरदेव गणेश बाळकृष्ण पाटील यांनी वरातीपूर्वी पीपरी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
सकाळी ११ वाजतापर्यंत राजुरा – २१.४० टक्के, बल्लारपूर – २०.१० टक्के, चंद्रपूर – १९.०३ टक्के, वरोरा – १७.७५टक्के, चिमूर – २१टक्के, ब्रह्मपुरी – २१.९८टक्के, वणी, १९.९६टक्के, आर्णीत १५.५० टक्के मतदान झाले.
हेही वाचा…अकोला : लोकसभा निवडणुकीत आमदारांची कसोटी, विधानसभा मतदारसंघनिहाय मतांचे गणित निर्णायक
जिल्ह्यात आतापर्यंत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, आमदार सुभाष धोटे यांनी मतदान केले. जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद सीईओ विवेक जॉन्सन, आयुक्त विपिन पालीवाल यांनीही मतदानाचा हक्क बजावला.