चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. बँकेत संचालक पदावर निवड होण्यासाठी नामनिर्देशन पत्र छाननीत पात्र ठरावे यासाठी उमेदवारांनी धक्कादायक प्रकार केल्याचे आता समोर आले आहे. यापैकीच एक म्हणजे पात्र होण्यासाठी कोणत्याही सहकारी संस्थेवर एका वर्षाचा संचालक पदाचा अनुभव ही अट आहे. या अटीच्या पूर्ततेसाठी अनेक उमेदवारांनी पैनगंगा वाहतूक सहकारी संस्था चंद्रपूर, मर्यादित कोरपना या संस्थेचे प्रमाणपत्र जोडले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे बाजूलाच या संस्थेच्या अध्यक्षांचे कार्यालय असल्याने त्यांनी खिरापतीसारखे प्रमाणपत्र वाटपासाठी एक खिडकी योजनाच सुरू केली होती, असा आरोप आता होत आहे.

येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज पात्र व्हावा यासाठी छाननीच्या दिवशी गुरुवारी उमेदवारांनी दिवसभर चांगलीच कसरत केली. अनेक युक्त्या लढवत अनेक प्रकार केल्याचे समोर येत आहे. बँकेच्या उपविधीनुसार बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत पात्र होण्यासाठी कोणत्याही सहकारी संस्थेवर एका वर्षाचा संचालकपदाचा अनुभव आवश्यक आहे. नामनिर्देशन दाखल करताना तसे प्रमाणपत्र नामांकन अर्जासोबत दाखल करावे लागते. अन्यथा छाननी प्रक्रियेत अर्ज फेटाळला जातो. गुरुवारी छाननीच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्रांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप आहे. गोंडपिपरी तालुक्यातून ‘अ’ गटात अमर बोडलवार, पोंभूर्णा तालुक्यातून ‘अ’ गटात उमारानी मरपल्लीवार आणि तुकाराम पवार विमुक्त जाती गटातून संचालकपदासाठी उभे आहेत.

छाननीनंतर उमेदवारांच्या अंतिम यादीत या तिघांचीही नावे आहेत. मात्र, आता त्यांच्या अनुभवाच्या प्रमाणपत्रावरून वादंग होण्याची शक्यता आहे. या तिघांनीही पैनगंगा वाहतूक सहकारी संस्था चंद्रपूर मर्या. कोरपना या संस्थेच्या संचालक मंडळावर असल्याचे प्रमाणपत्र नामांकन अर्जासोबत जोडले आहे. मात्र, या तिघांचेही प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा विरोधकांचा आहे. सन २०११ मध्ये स्थापन झालेली पैनगंगा खोरे ही संस्था अवसायनात गेली होती. त्यानंतर संस्थेने मतदार यादी जिल्हा निबंधकाकडे सादर केली. निवडणुकीसाठी शुल्क जिल्हा निबंधक कार्यालयात जमा केले. परिणामी, अवसायनाचा आदेश मागे घेण्यात आला. संचालक मंडळाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. सन २०२२-२३ ते २०२७-२८ पर्यंतचे संचालक मंडळ निवडून आले. अध्यक्षपदी प्रकाश देवतेळे यांची निवड झाली. १३ संचालकांपैकी चार जागा रिक्त होत्या. मात्र, संचालक म्हणून बोडलवार, पवार आणि मरपल्लीवार यांचे त्यात नाव नव्हते. या संस्थेने ३ जून २०२२ तारीख असलेले बँकेच्या निवडणुकीसाठी मरपल्लीवार आणि पवार यांनी संचालक असल्याचे प्रमाण दिले. मात्र, बोडलवारांच्या नावाचा यात उल्लेख नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोडलवार यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रात ते मागील दोन वर्षांपासून पैनगंगा वाहतूक खोरे सहकारी संस्थेत संचालक म्हणून कार्यरत असल्याचा दावा केला आहे. उपरोक्त दोघांना २०२२ च्या तारखेत संचालक असल्याचे सांगितले आहे. आता यासंदर्भात विरोधकांनी न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. दरम्यान या लढाईत अनेकांचे नामनिर्देशनपत्र रद्द होण्याची तर अनेकांचे पात्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यासंदर्भात पैनगंगा खोरे वाहतूक सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांना विचारणा केली असता, नियमानुसार स्वीकृत सदस्य म्हणून संस्थेत घेतले आहे, असे सांगितले. मात्र, संस्थेच्या लेटर हेडमध्ये स्वीकृत सदस्यांची नावेच नाही, असेही दिसून येत आहे.