गडचिरोली : जिल्ह्यात प्रस्तावित लोहप्रकल्पासाठी चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी शासनाने काही महिन्यांपूर्वी अधिसूचना काढली आहे. यावरून जवळपास २५ गावातील नागरिकांमध्ये असंतोष असून ऐन लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना येथील ग्रामस्थांनी हाकलून लावले असून प्रचाराचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई केल्याने भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे.

बऱ्याच नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांना शेवटच्या क्षणी तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली. मात्र, प्रचारादरम्यान त्यांना व कार्यकर्त्यांना ‘अँटीईन्कंबंसी’चा फटका बसत असल्याचे चित्र आहे. त्यात अधिक भर पडली असून चामोर्शी तालुक्यातील जवळपास २५ गावातील नागरिक भूसंपादनावरून पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. दरम्यान, मुधोलीचक क्र. १ आणि जयरामपूर येथे भाजपचे काही नेते व कार्यकर्ते प्रचारासाठी गेले असता त्यांना गावकऱ्यांनी हाकलून लावले. इतक्यावरच न थांबता त्यांना गावात बॅनर लावण्यास मनाई केली आहे. भूसंपादनावरून बहुतांश गावातील नागरीकांमध्ये रोष बघायला मिळत असून याविरोधात वर्षभरापासून आंदोलन करण्यात येत असताना खासदार कुठे होते. आता निवडणुका आल्या की ते आमच्याकडे येत आहेत, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. एक-दोन दिवसात सर्व प्रभावित क्षेत्रातील गावकरी एकत्र बैठक घेणार असून त्यानंतर पुढची भूमिका एकत्रितपणे ते जाहीर करणार आहेत.

हेही वाचा…‘शिंदें’चा भाजप बंडखोर शिंदेंना फोन, गिरीश महाजन बुलढाण्यात; महायुतीतील नाराजीनाट्य चिघळले…

प्रकरण काय आहे ?

गडचिरोली जिल्ह्यातील प्रस्तावित लोहप्रकल्पासाठी चामोर्शी तालुक्यातील कोनसरी, मुधोली चक क्र.१, सोमनपल्ली, जयरामपूर, मुधोलीचक क्र.२, पारडी देव यांच्यासह जवळपास २५ गावातील ९६३.०५२२ हेक्टर जमीन शासनाने संपादित करण्याचे ठरवले आहे. परंतु या भूसंपादनाला गावकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. त्यांनी याविरोधात दोन वेळा मोर्चा देखील काढला होता. त्यावेळेस कोणत्याच लोकप्रतिनिधींनी साथ दिली नाही. यामुळे त्यांचा खासदारांवर रोष आहे.