गडचिरोली : एकेकाळी नक्षल्यांच्या कारवायांमुळे दहशतीत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात विकासाची नवी पहाट उजाडली आहे. येथील तरुणांनी हाजरोंच्या संख्येने मॅरेथाॅनमध्ये सहभागी होत नक्षल्यांना उत्तर दिले आहे. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गडचिरोली पोलीस दलाकडून आयोजित ‘महामॅरेथाॅन’मध्ये सहभागी होत देवेंद्र फडणीवस यांनी शहरातील मार्गावरून पहाटे चार किलोमिटर ‘मॉर्निंग वॉक’ केला.

हेही वाचा : दिल्ली एम्सच्या धर्तीवर आता नागपुरातही ‘शरीराची चिरफाड न करता शवविच्छेदन’!

जिल्हा पोलीस प्रशासनाकडून गडचिरोली येथे तीन दिवसीय ‘गडचिरोली महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारपासून शहरात मुक्कामी आहेत. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमात हजेरी लावल्यानंतर आज, रविवारी पहाटे सहा वाजता ते ‘महामॅरेथॉन’मध्ये सहभागी झाले. यावेळी मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून त्यांनी स्वतः गडचिरोली शहरातील रस्त्यावरून चार किलोमीटर पायी फेरफटका मारला. यावेळी मध्यामांसोबत त्यांनी संवाद साधला.

हेही वाचा : शहरी भागांत विकास, ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष; उपराजधानीत पायाभूत सुविधांचा विस्तार; संत्री उत्पादकांना फटका

ते म्हणाले की, मॅरेथॉन स्पर्धेत हजारोंच्या संख्येने सहभागी झालेले तरुणांनी हे दाखवून दिले की आम्हाला कुणी थांबवू शकत नाही. यामाध्यमातून तरुणाईने नक्षल्यांना आम्ही घाबरत नाही, असे उत्तर दिले आहे. स्पर्धेतील उत्साह बघता एक नवे चित्र येथे पाहायला मिळत आहे. त्यामुळे येथील जनतेल मी एकच संदेश देऊ इच्छितो की, निर्भयपणे जगा, विकासाच्या माध्यमातून भविष्यात येणाऱ्या असिमित संधींचा फायदा घ्या, आपला आणि समाजाचा विकास करा. असे ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी, नक्षलविरोधी अभियानाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य सिंह तसेच जिल्ह्यातील अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.