गडचिरोली : भामरागड तालुक्यातील गुंडापुरीत वृद्ध आजी- आजोबांसह नातीची गळा चिरुन हत्या केल्याची घटना ७ डिसेंबरला उघडकीस आली. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय असून पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. दोन महिन्यांपूर्वी अहेरी तालुक्यातील महागावात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाली होती. आता गुंडापुरीतील तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अर्चना रमशे तलांडे (१०,रा.येरकल ता.एटापल्ली), देवू दसरु कुमोटी (६०), बिच्चे देवू कुमोटी (५५,रा. गुंडापुरी ता. भामरागड) अशी मृतांची नावे आहेत. देवू कुमोटी यांची विवाहित मुलगी मरकल (ता.एटापल्ली) येथे राहते. चौथीच्या वर्गात शिकणारी तिची कन्या अर्चना तलांडे ही दिवाळीच्या सुटीत आजी- आजोबांकडे आली होती.अर्चना तलांडेसह देवू व बिच्चे कुमोटी या तिघांचा गळा चिरलेला मृतदेह ७ डिसेंबरला घरात आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. घटनास्थळी एटापल्लीच्या बुर्गी (कांदोळी) ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत.
हेही वाचा : आमच्या रेटयामुळे अखेर कुंभकर्ण सरकार जागे… वडेट्टीवार
हत्या नेमकी कोणी केली व संपत्तीचा वाद नेमका कोणासोबत होता, या बाबींच्या आधारे तपास सुरु आहे. दरम्यान, जिल्ह्यात नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताह सुरु आहे. या पार्श्वभूमीवर १८ दिवसांत चौघांची हत्या झाली आहे. त्यातच गुंडापुरीतील घटनेने खळबळ उडाली आहे. मात्र, ही घटना नक्षल्यांशी संबंधित नाही, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. “ही घटना वैयक्तिक संपत्तीच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. योग्य तो तपास करुन आरोपींना जेरबंद केले जाईल.” – नीलोत्पल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली</p>