गोंदिया : एचआयव्ही एड्स एक प्रकारची धास्ती मनात घर करून जाते. या आजाराबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली असली तरी या जीवघेण्या आजाराने जगभरात आपले पाय पसरले आहे. दरम्यान, आयसीटिसी विभागाच्या नोंदीनुसार गोंदिया जिल्ह्यातही या आजाराने ग्रस्त असलेल्यांची संख्या बऱ्यापैकी असून मागील २० वर्षात जिल्ह्यात ३ हजाराच्या वर एड्स या आजाराने ग्रस्त असलेल्यांची नोंद आहे. सद्यास्थिती जिल्ह्यात १८५२ एड्स आजाराने पीडित उपचार घेत आहेत. जगभर पसरलेल्या एड्स या जीवघेण्या आजारबद्दल जगभर जनजागृती व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केल्यानुसार दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो.
गोंदिया जिल्ह्यातही या दिनाच्या निमित्ताने आरोग्य विभाग व आयसीटीसी केंद्राच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असतात. यंदाही १ डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर निबंध व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करून जनजागृती करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात एड्स या आजाराने ग्रस्त असलेल्यांचा आढावा घेतला असता २००२ या वर्षीपासून जिल्ह्यात एड्स तपासणीला सुरुवात करण्यात आली. यामध्ये आतापर्यंत ३ हजार ७६ एड्स ग्रस्तांची नोंद केली आहे. आजघडीला जिल्ह्यात ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र, २ ग्रामीण रुग्णालय २ शासकीय जिल्हा रुग्णालय व खासगी असे ५८ तपासणी केंद्र स्थापन करण्यात आले असून २०१० यावर्षीपासून जिल्ह्यात एआरटी उपचार सुरू झाले आहे. दरम्यान, १८५२ पीडित हा उपचार घेत आहेत. एड्स आजाराबाबत अनेक जन अद्यापही अनभिज्ञ आहे. त्यासाठी जागरूक असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : चार दिवसांपासून होता बेपत्ता, अखेर मृतदेहच सापडला; प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या झाल्याचा संशय
पाच वर्षात ४७७ जणांचा मृत्यू
या जीवघेण्या आजारापासून जिल्ह्यातही शेकडो जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या पाच वर्षात म्हणजेच २०१८ या वर्षीपासून ४७७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात २०१८-१९ या वर्षी १९९ जणांच्या मृत्यूची नोंद केली आहे. तर २०१९-२० या वर्षात १००, त्याचबरोबर २०२०-२१ यावर्षी ४८, २०२१-२२ ला ७५, २०२२-२३ या मगील वर्षात ८५ तर २०२३-२४ या चालू वर्षात ५० एड्स पीडितांचा जीव गेला आहे.
हेही वाचा : अमरावती जिल्ह्यातील २६ हजार हेक्टरमधील शेती पाण्यात
“जिल्ह्यात यावर्षी २४ हजार ५५६ जणांची तपासणी केली असून त्यापैकी ५० संक्रमित आढळले आहे. तर १२ हजार २२ गरोदर मातांची तपासणी केली असता एक महिला एड्स आजाराने ग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. एड्स हा जीवघेणा आजार असला तरी नियमित औषधी व पुरावे व्यायाम आदीने सर्वसामान्य जीवन जगता येते. तेव्हा घबरून न जाता वैद्यकीय सल्ला घ्यावा. त्याचबरोबर प्रत्येकांनी जवळच्या आयसीटीसी केंद्रात विशेषतः गरोदर मातांनी निरोगी बाळाच्या जन्मासाठी तपासणी करून घ्यावी.” – संजय जेनेकर, जिल्हा पर्यवेक्षक, केटीएस जिल्हा रुग्णालय, गोंदिया.