नागपूर : कोकणासह घाट परिसरात आणि मध्यमहाराष्ट्र तसेच विदर्भातील काही तालुक्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, पश्चिम विदर्भात कोसळणाऱ्या पावसाने पूर्व विदर्भाकडे पाठ फिरवल्याने खात्याचा हा अंदाज तरी खरा ठरणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाऱ्याचा वेग वाढला असून मोठ्या प्रमाणात बाष्प किनारपट्टीला येऊन धडकत असल्याने किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक आहे. घाट परिसरात देखील पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात लवकरच कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे. हवामानाची सतत बदलणारी ही परिस्थिती पाहता नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात काही भागात मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे, तर काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. ठाणे, पालघर, आणि मुंबई परिसरात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज आहे.

हेही वाचा : फुटलेल्‍या आमदारांमध्ये सुलभा खोडके यांच्या नावाची चर्चा…त्या म्हणाल्या, “स्थानिक राजकारण…”

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या भागांमध्येही विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होत आहे. कोल्हापूरचा घाटाकडील भाग आणि पुण्याच्या घाटाकडील भागातही पावसाचे ढग आहेत. महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, वाशीम, हिंगोली, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांमध्ये सायंकाळी उशिरा किंवा रात्री मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली भागात विखुरलेल्या स्वरूपात हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पूर्व विदर्भाला अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर येथेही मध्यम पावसाची शक्यता आहे. सातारा, पुणे, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यांमधील पश्चिमेकडील भागात पावसाचा अंदाज आहे. तर सोलापूर, सांगलीच्या काही भागांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे.

संपूर्ण कोकणातच आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर घाट परिसरातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. रायगडच्या सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा : विधान परिषद निवडणुकीत नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचा जो आमदार फुटला…त्याचे नाव…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य महाराष्ट्रात अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहता, राहुरी, पाळनेर या भागांत हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज आहे. पूर्वेकडील भागांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात अकोट, तेल्हारा, जळगाव जामोद, संग्रामपूर, धारणी, चिखलधरा, मंगळूरपीर, पुसद, महागाव, उमरखेड, मापूर, किनवट या तालुक्यांमध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी येऊ शकतात.