नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) सहाय्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) २०२२-२३ वर्षात घेण्यात आलेल्या कर सहायक निरीक्षक(एसटीआय), पोलिस उपनिरीक्षक(पीएसआय) आणि सहायक कक्ष अधिकारी (एएसओ) पदाच्या निकालात ५२ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश प्राप्त केले. विद्यार्थांना उत्तम प्रशिक्षण दिल्यामुळेच ओबीसी विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिली.
हेही वाचा : जिल्हा न्यायालयांत ४६२९ पदांसाठी भरती, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
महाज्योती ही राज्यातील ओबीसी, व्हिजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षांपासून दर्जेदार प्रशिक्षण तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य करीत असल्याचे खवले यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगितले. याचीच फलश्रृती आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. एमपीएससीच्या कर सहायक पदासाठी ४७५ जांगा पैकी २१२ जागा ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी होत्या. महाज्योती अंतर्गत ज्ञानदीप अकादमीचे ४३ तर युनिक अकादमीच्या ९ विद्यार्थी उत्तीर्ण होत त्यांनी यश प्राप्त केले आहे. विद्यार्थांना उत्तम प्रशिक्षण दिल्यामुळेच ५२ ओबीसी विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती राजेश खवले यांनी दिली. महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले.