नागपूर: एका तरुणाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. शीतपेयात गुंगीचे औषध मिळवून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर तिला घरी नेऊन बलात्कार केला. ती गर्भवती झाल्याचे समजताच बळजबरीने गर्भपातही करून घेतला. इतकेच नाही तर त्याने वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार करत जीवे मारण्याची धमकीही दिली. शेवटी कंटाळून मुलीने त्याच्यापासून दुरावा केला असता त्रास देऊ लागला. घटनेची तक्रार अंबाझरी ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी १७ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली. विशाल हनुमंत पिल्लेवान (२१) रा. अंबाझरी असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.

विशाल परिसरातच मक्याचे कणीस (भुट्टा) विकतो. गेल्या वर्षी विशालने १२वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी मैत्री केली. दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. फेब्रुवारी महिन्यात त्याने मुलीला भेटायला बोलावले. शीतपेयात गुंगीचे औषध मिसळून तिला प्यायला दिले. तिला भोवळ आल्याने आपल्या वाहनाने स्वत:च्या घरी घेऊन गेला. तेथे बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. काही वेळात तिला जाग आली. तेव्हा तिच्या अंगावर कपडे नसल्याने तिने विचारणा केली. त्याने तिची माफी मागून प्रकरण मिटवले.

हेही वाचा… यवतमाळ: अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांनी मुलीला गर्भवती असल्याचे कळले. तिने विशालला याबाबत माहिती दिली. विशालने तिला गोळ्या देऊन गर्भपात करून घेतला. यानंतरही तो मुलीला त्रास देत होता. वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकत होता. मुलीने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे संतापून त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली व मारहाण केली. तो वारंवार धमकावून तिचे लैंगिक शोषण करीत होता.

दरम्यान मुलीच्या कुटुंबीयांना दोघांच्या संबंधाबाबत समजले. विचारपूस केली असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. प्रकरणाची तक्रार पोलिसात करण्यात आली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून विशालला अटक केली.