नागपूर : शहरातील उंच जाहिरात फलकांवरील कारवाईचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक तापू लागला आहे. काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्या पाठोपाठ भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी इमारतींवर लावण्यात आलेल्या उंच जाहिरात फलकांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुंबईतील घटनेनंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने फलक तपासणी सुरू केली आहे. फलकाबाबत असलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून फलक लावण्यात आले आहे किंवा नाही याची तपासणी केली जात आहे. तपासणीच्या काळातच झालेल्या वादळामुळे काही ठिकाणी फलक कोसळले, त्यामुळे मजबुतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी शहरात चारशेहून अधिक फलक बेकायदेशीर असल्याची तक्रार आयुक्तांकडे केली.
हेही वाचा : आता कायदेशीर मार्गाने कुलगुरू डॉ. चौधरींच्या निलंबनाचा डाव? चौकशी अहवालावर उत्तर सादर करण्याचे आदेश
आता भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी इमारतीवर लावण्यात आलेल्या उंच फलकांवर कारवाईची मागणी केली. इमारतींवर ४० ते ५० फूट उंच फलक लावण्यात आले आहेत. वादळामुळे ते कधीही कोसळू शकतात. महापालिकेच्या दहाही झोन कार्यालयांच्या हद्दीत असलेल्या अशा फलकांची तपासणी करून कारवाई करावी तसेच मोबाईल टॉवरही धोकादायक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नागपूरमध्ये बाजारपेठा आणि चौकाचौकात मोठे जाहिरातफलक लावण्यात आले आहेत. सरासरी ११०० हून अधिक या फलकांची संख्या आहे.
महामार्ग, वळण मार्ग, विमानतळाकडे जाणारे रस्ते, बसस्थानक, रेल्वेस्थानकाकडे जाणारे सर्व रस्ते फलकांनीव्यापले आहे. बसस्थानकाच्या आतल्या बाजूनेही मोठ्या प्रमाणात फलक लागलेले दिसतात. अनेक दिवसांपासून हे फलक लागले असल्याने व त्याची नियमित तपासणी होत नसल्याने सांगाडे कमकुवत झाले आहेत. वादळामुळे ते केव्हाही कोसळू शकतात. इमारतींवरील फलक कोसळला तर तो खाली घरांवर किंवा गर्दीच्या ठिकाणी कोसळू शकतो, त्यामुळे ते अधिक धोकादायक आहेत, असा दावा खोपडे यांनी केला आहे.
हेही वाचा : आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच विदर्भाच्या खेळाडूला कर्णधारपद….
सरकारी फलकांचा प्रश्नही ऐरणीवर
रस्त्यांवर, चौकाचौकात नव्हे तर सरकारी कार्यालाच्या आतमध्ये परिसरातही जाहिरात किंवा सरकारी योजनांची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहे. या फलकांचीही मजबुतीबाबतची तपासणी होणे गरजेचे आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोरील मोकळ्या भागात सरकारी योजनांचे फलक दिसून येतात. त्याच प्रमाणे जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीजवळही अनेकफलक लागलेले आहेत. हे सर्व फलक मोकळ्या जागेत आहेत. मात्र परिसरात नागरिकांची वर्दळ अधक असते. दुपारच्यावेळी ते वादळामुळे कोसळले तरी धोका उत्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.